आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता
ठाणे : उत्तरप्रदेश येथे चालक (ड्रायव्हिंग) म्हणून व्यवसाय करणाऱ्या एका आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्कराला ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. मोहमद मकसुद मोहमद अहमद (४२) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ३ कोटी ३९ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. त्याने नेपाळच्या सिमेवरून हे अमली पदार्थ मुंबई, ठाण्यात विक्रीसाठी आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी अमली पदार्थ तस्करांचा शोध सुरु केला आहे. ठाण्यातील उथळसर भागात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, अमली पदार्थ विरोधी पथकाने उथलसर येथे सापळा रचून मोहमद अहमद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांनी त्याच्याकडून ३ कोटी ३९ लाख रुपये किमतीचा ३ किलो ३९० ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ आढळून आला. त्याच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेपाळ सिमा ते मुंबई
– पोलिसांनी मोहमद अहमद याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता, तो उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथील असल्याचे समोर आले. तसेच त्याने हा अमली पदार्थ नेपाळ येथील सिमेवरील एका भागातून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याने हे अमली पदार्थ कुठून आणले आणि कोणाला विक्री करणार होता. त्याच्यासोबत या तस्करीमध्ये कितीजण सहभागी आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपक डुम्मलवाड, मोहन परब, पोलीस हवालदार हरीष तावडे, अभिजीत मोरे, हेमंत महाले, अमोल देसाई, हुसेन तडवी, शिवाजी रावते, शिवाजी वासरवाड, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीष पाटील, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे, आबाजी चव्हाण, चालक पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली.