ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर महिलांच्या रेल्वे डब्यात प्रवास करण्याच्या बहाण्याने चढून गर्दीचा गैरफायदा दागिने चोरी करणाऱ्या महिलेला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. कविता लोखंडे (३३) असे तिचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच तिच्याकडून २७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

गेल्याकाही वर्षांमध्ये मध्य रेल्वे मार्गावर मुंबईत कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा अनेक चोरटे घेतात. अंबरनाथ येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिला २३ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वरुन अंबरनाथच्या दिशेने प्रवास करत होत्या. त्या रेल्वे डब्यामध्ये प्रवेश करताना अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र एका महिलेने हिसकावले. संबंधित चोर महिला पळून जात असताना तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने तिचे नाव कविता लोखंडे असल्याचे सांगितले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तिचा अभिलेख तपासला असता, तिने यापूर्वी अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले असून तिच्याकडून २७.५ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात तिला अटक केली आहे.