ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून ठाणे, मुंबईतील ९२ गुंतवणूकदारांची ७ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘डिवाईन पाॅवर फाॅरेक्श ट्रेडिंग’ कंपनीच्या संचालकाला ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अजय उसारे असे त्याचे नाव असून मागील तीन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला उत्तराखंड येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

वागळे इस्टेट येथे डिवाईन पाॅवर फाॅरेक्श ट्रेडिंग या नावाने अजय उसारे याने एक कंपनी सुरु केली होती. १५ महिने गुंतवणूक केल्यास पुढील १५ महिन्यांनी गुंतवणूकीवर दरमहा १५ टक्के व्याज मिळेल अशी योजना कंपनीने आखली. जादा परताव्याच्या अमीषाला बळी पडून ठाणे, मुंबईतील ९२ जणांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु परतावा मिळत नसल्याने २०२२ मध्ये गुंतवणूकदारांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कंपनीचा संचालक अजय उसारे याच्यासह त्याच्या इतर साथिदारांविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणात ७ कोटी १४ लाख ९३ हजार ३४९ रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. परंतु मुख्य सुत्रधार अजय हा फरार झाला होता. दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरु होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय हा दुबई, नेपाळमध्ये लपून बसल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. तो १३ जूनला उत्तराखंडमधील डेहराडून येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, २६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. पोलिसांनी त्याची आठ कोटी रुपयांची मालमत्ता संरक्षित केली आहे.