ठाणे : मुंब्रा येथील बाह्यवळण परिसरात हायब्रीड गांजा आणि मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन(एमडीएमए/एकस्टेसी) गोळ्या या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला ठाणे पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ कोटी ३८ लाखांचे अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून हा साठा तो कुणाला विक्री करणार होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अमली पदार्थ विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेतंर्गत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने मुंब्य्रात कारवाई करून २ कोटी ३८ लाखांचे अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच सुमित राजुराम कुमावत (२१) याला अटक केली आहे.

सुमित हा मुळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो बोरिवली परिसरात राहतो. तो मुंब्रा येथील बाह्यवळण परिसरात हायब्रीड गांजा आणि मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन (एमडीएमए/एकस्टेसी) गोळ्या या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आला होता. याबाबत अमली विरोधी पथकातील पोलिस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उप निरिक्षक राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता.

सुमित हा परिसरात संशयास्पद रित्या फिरताना दिसताच, पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या झडतीत हायब्रीड गांजा आणि मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन(एमडीएमए/एकस्टेसी) गोळ्या असा २ कोटी ३८ लाखांचे अमली पदार्थाचा साठा आढळून आला. पथकाने त्याला अटक करून अमली पदार्थ साठा जप्त केला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने ४ सप्टेंबर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हायब्रीड गांजा म्हणजे काय

भारतीय गांजाचा वास हा उग्र असतो आणि तो भारतीय बाजारात दहा हजार रुपये किलोने विकला जातो. तर, हायब्रीड गांजा हा परदेशात तयार होतो. या गांजाला उग्र वास नसला तरी त्याची नशा भारतीय गांजा पेक्षा अधिक असते. तसेच एक किलो हायब्रीड गांजाची किंमत कोटी रुपयात असते. तसेच मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन(एमडीएमए/एकस्टेसी) गोळ्या या जीभेवर ठेवून त्याचे सेवन केले जाते. अभासी जगात जाण्यासाठी ही नशा केली जाते. हे दोन्ही अमली पदार्थ पार्टीसाठी वापरले जाते, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग

सुमीत याने अमली पदार्थ कोठून आणले याचा तपास पोलिस करीत आहेत. या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.

पोलिसांकडून आवाहन

अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि सेवन हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती असल्यास कृपया अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची नावे गुप्त ठेवण्यात येतील.