ठाणे : जुना खारीगाव टोलनाका जवळील परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ७५ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अमली पदार्थ विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेतंर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, ठाणे गुन्हे शाखा शोध १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने खारीगाव जुना टोलनाका येथे कारवाई करून ७५ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत सुरेशसिंह गंगासिंह तंवर (३५) आणि त्याचा साथीदार कुलदिपसिंह परिहार या दोघांना अटक केली आहे.
सुरेशसिंह हा मध्यप्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात राहतो. तो त्याच्या वाहनाने मुंब्रा येथे एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मुंब्रा येथे जाण्यासाठी तो नाशिक महामार्गाने जुना खारीगाव टोलनाका यामर्गाचा वापर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्याआधारे, अंमली पदार्थ कारवाई पथकाने त्याठिकाणी सापळ रचला होता. खारीगाव टोलनाका येथे त्याचे वाहन येताच, पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्या वाहनाच्या झडतीमध्ये एकूण ७५ लाखा २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ५०१. ५० ग्रॅम वजनाचा एमडी क्रिस्टल पावडर हा अमली पदार्थाचा साठा आढळून आला. याप्रकरणी पथकाने सुरेश याला अटक करून त्याच्याजवळील वाहन आणि अमली पदार्थ साठा जप्त केला. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या अधिक तपास करताना अटक आरोपी सुरेशसिंह तंवर याने त्याचे साथीदार कुलदिपसिंह परिहार आणि अभिषेक जैस्वाल यांच्या सह सदरचा अंमली पदार्थ विक्री करीता ठाणे येथे आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, इतर दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्यापैकी आरोपी कुलदिपसिंह परिहार याला १२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपी यांची २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी हे मूळचे मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असून, त्यांनी जप्त अंमली पदार्थ मध्यप्रदेश व राजस्थान सीमेजवळील गावातून विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे करत आहेत.