ठाणे – राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बहिणींची राखी पाठवण्याची लगबग सुरू झाली आहे. विशेषतः परगावी असलेल्या भावांना राखी वेळेत मिळावी, यासाठी अनेक बहिणी मागील काही दिवसांपासून टपाल कार्यालयात गर्दी करत आहेत. मात्र, शहरातील ठाणे स्थानक परिसरात असलेल्या टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे राखी पाठवण्याच्या तसेच इतर आर्थिक व्यवहार प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले.
भाऊ बहिणीचे नाते घट्ट करण्यासाठी टपाल विभागाची परंपरा डिजिटल युगातही टिकून आहे. दूरवर असलेल्या भावापर्यंत राखी पोहचवण्यासाठी बहिणींकडून आजही टपाल विभागास पसंती दिली जात आहे. तसेच सर्व सभासदांच्या सोयीसाठी ठाणे शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखीच्या वस्तू स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
राखी योग्य त्या पत्त्यावर जलद गतीने पोहचवण्यासाठी पोस्ट विभागाचा प्रयत्न असतो. यासाठी ऑनलाईन राखी टपाल या नावाने मागील काही वर्षापासून सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात टपाल विभागाने आयटी २.० ही नवीन प्रणाली आर्थिक व्यवहारासाठी लागू केली आहे. यामध्ये राज्याच्या बाहेर एक ते दोन दिवसांमध्ये राखी योग्य पत्त्यावर पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे भावांना राखी वेळेत मिळावी, यासाठी अनेक बहिणी मागील अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील विविध भागातील टपाल विभागामध्ये नागरिकांची सकाळपासूनच गर्दी करत आहेत.
बहिणी हातात राख्यांची पाकिटे घेऊन लांबच लांब रांगा लावत आहेत. मात्र, दोन दिवसांपासून शहरातील स्थानक परिसरात असलेल्या टपाल कार्यालयामधील सर्व्हर डाऊन झाले आहे. आयटी २.० ही नवीन प्रणाली सुरू केल्याने वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राखी पाठवण्याची प्रक्रिया तसेच आर्थिक व्यवहार दोन दिवसांपासून रखडले आहेत. काही कार्यालयांमध्ये संथगतीने काम सुरू असले, तरी बहुतेक ठिकाणी संपूर्णपणे सेवाच ठप्प असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे नागरिकांना माहिती नसल्याने नागरिक सकाळी ७ वाजल्यापासून पोस्ट कार्यालयाच्या बाहेर रांग लावत आहेत असे एका नागरिकाने सांगितले.
राखी वेळेत पोहचावी म्हणून दोन दिवसांपासून टपाल कार्यालयात येत आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून रांगेत आहे. पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे काम होतच नाही असे एक नागरिकाने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.