ठाणे: दहीहंडी स्पर्धेत ‘जय जवान गोविंदा पथकाने’ लावलेल्या दहा थरावरून पुन्हा एकदा राजकारणाचे थर दिसून आले आहेत. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमावर आणि आयोजक पूर्वेश सरनाईक यांच्यावर थेट टीका केली आहे. पाटील यांनी सरनाईक यांच्या प्रो गोविंदा कार्यक्रमात झालेल्या राजकारणाचा दाखला देत टीका केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये राजू पाटील यांनी जय जवान गोविंदा पथकाचे अभिनंदन करत म्हटले आहे की, या पथकाने एकाच दिवसात तब्बल तीन वेळा दहा थर लावून हॅट्रिक केली. परंतु, काही स्पर्धांमध्ये त्यांना राजकीय आकसापोटी प्रवेश नाकारण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पाटील यांनी थेट शब्दांत टोला लगावत लिहिले की, मराठी माणसांच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंना सलामी दिल्याच्या रागातून काही ठिकाणी या पथकाला डावलण्यात आले होते. आज मात्र जय जवान पथकाने ठाण्यातील मैदानात आपल्या ताकदीची छाप सोडत राजकारणाचे सर्व थर उलगडून दाखवले.
“संस्कार आणि संस्कृती ही वागण्यात असली पाहिजे, नुसत्या नावात काय आहे,” असा उपरोधिक शेरा पाटील यांनी मारला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजक असलेले पूर्वेश सरनाईक यांच्यावर अप्रत्यक्ष टीका झाल्याचे स्पष्ट होत आहे.
राजू पाटील पोस्टमध्ये काय म्हणाले…
मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला.
आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ?
पुर्वेश सरनाईक यांच्याकडूनही राजकारणाचा उल्लेख
कोकण नगर गोविंदा पथकाने सरनाईकांच्या दहीहंडीच्या ठिकाणी दहा थर लावत पहिल्यांदा विक्रम केला. त्यानंतर सायंकाळी जय जवान दहीहंडी पथकाने दहा थरांचा प्रयत्न केला. त्यांनी दहा थर लावल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना पुर्वेश सरनाईक यांनी राजकारणावर भाष्य केले होते. स्पर्धेच्या वेळी काही लोकांनी घाणेरडे राजकारण केले होते, असा उल्लेख सरनाईक यांनी केला होता. त्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडी कार्यक्रमात जय जवान दहीहंडी पथकाने पुन्हा दहा थर लावत विक्रम केला. त्यावेळी जाधव यांनी पथकासह मोठा जल्लोष केला होता.