ठाणे – दररोजच्या धकाधकीत रस्त्यांवर घडणारे अनेक प्रसंग, क्षण आपल्या नजरेतून सहज सुटतात. यंदा ह्याच क्षणांना, दुर्लक्षित राहणाऱ्या व्यक्तिरेखा, घटना आणि दैनंदिन जीवनातील साध्या वाटणाऱ्या हालचालींना रांगोळीच्या रंगांतून जिवंत करण्याचा प्रयत्न ठाण्यातील कलाकारांनी केला आहे. ठाण्यातील रांगोळी प्रदर्शनाच्या १६व्या वर्षानिमित्त रस्त्यावर घडणाऱ्या १६ वेगळ्या घडामोडींची मालिका रांगोळीच्या माध्यमातून उलगडण्यात आली आहे.

चंपाषष्ठी उत्सवा निमित्ताने श्री आनंद भारती समाज आणि कलाछंद रांगोळीकार कलाकार यांच्यावतीने रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाचे १६ वे वर्ष आहे. सामाजिक भान, दैनंदिन वास्तव आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम असलेले हे प्रदर्शन ठाणेकरांसाठी दरवर्षी आकर्षक ठरते. या प्रदर्शनाचे उद्घाटन क्रिकेटपटू आणि अभिनेते संदीप जुवाटकर यांच्या हस्ते झाले. कलाकृतींच्या नेमक्या निरीक्षणशक्तीचे, रांगोळीतील बारीकसारीक तपशीलांचे कौतुक करताना, “या कलाकृतींना तोड नाही” असे जुवाटकर म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर आणि कलाछंद मंडळाचे अध्यक्ष सुभाष शाक्यवार उपस्थित होते.

या प्रदर्शनाची सुरुवात १२ वर्षीय नियती मुकादम हिने पहिल्यांदाच रेखाटलेल्या श्री गणेशाय नमः ने झाली. त्यानंतर राजन शिरोडकर यांनी काढलेले मासे विकणारी कोळीण, हिंदवी तरे यांनी काढलेली भयभीत झालेली मुलगी, निलेश कोळी यांनी रेखाटलेले महिला मजूर कामगार, मुंबईचा डबेवाला दाखवणारे चित्र उमेश सुतार यांनी तर रस्त्यावर भविष्य सांगणारा ज्योतिष अमित सावंत यांनी काढले आहे. तसेच फुगे – खेळणी विक्रेती मुलगी आणि माकडवाला मदारी ही दोन्ही चित्रे सुभाष शाक्यावार यांनी रेखाटलेली आहेत. बबन राणे यांनी इडली – मेदुवडा विक्रेता, अनिरुद्ध जाधव यांनी भाजी विक्रेता, फळ विक्रेती योगेश भामणे आणि गोविंद सोनवणे यांनी रेखाटले आहे. मयंक थोरात यांने चहावाला तर सुनील मोरे यांनी नदी बैलवाला अशा व्यक्तिरेखा काढल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व चित्रांतून शहरातील रस्त्यावर दैनंदिन जगणे जगणाऱ्या सामान्य माणसांचे हसते-खेळते, कष्टमय असलेले पैलू रेखाटले गेले आहेत.

प्रदर्शन कुठे आणि केव्हा?

या वर्षीचे रंगावली प्रदर्शन २६ नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आनंद भारती सभागृह, चेंदणी कोळीवाडा, ठाणे येथे असणार आहे.