Thane News,Dahi Handi 2025 Celebration ठाणे – ठाणे शहर गोविंदांची नगरी म्हणून ओळखली जाते. आज सकाळ पासून ठाणे शहरात मुंबई तसेच उपनगरातील गोविंदा पथक ठाण्यात दाखल झाले आहेत. हे गोविंदा पथक दुचाकी, ट्रक घेऊन आले आहेत. या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पद्धतीने उभ्या केल्याने शहरातील वाहतूकीला अडथळा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे ठाणेकरांना त्रास होत असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.
सर्वच ठिकाणी दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चांगलीच चुरस रंगल्याची दिसत आहे. ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळतात.
यंदाच्या वर्षी या दहीहंडीला लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही आयोजकांनी प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकाला देखील पारितोषिक जाहीर केल्यामुळे ठाणे शहरात सकळापासून मुंबई, नालासोपारा, कांदिवली, दहिसर, जोगेश्वरी अशा विविध शहरातून गोविंदा पथक दाखल झाले आहेत. हे गोविंदा पथक दुचाकी तसेच ट्रक घेऊन आले आहेत.
नौपाडा येथे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने दही हंडीचे आयोजन केले जाते. ज्या परिसरात या दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्या परिसरापासून हाकेच्या अंतरावर ठाणे स्थानक आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. परंतू, हा रस्ता अरुंद आहे. यामार्गावरुन टीएमटी बसगाड्याही जातात. परंतू, आज सकाळपासून मुंबई तसेच उपनगरातून गोविंदा पथक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दुचाकी तसेच इतर वाहने ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी करण्यात आली आहेत.
हरिनिवास सर्कल पासून ते गोखले रोडपर्यंत ही वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली आहेत. यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शहराच्या मुख्य चौकातील रस्त्यांवर देखील हे गोविंदा पथक वाहने बेशिस्तपद्धतीने उभे करुन तिथे गर्दी करुन उभे असलेले पाहायला मिळत आहे. रस्त्यांवरुन दुचाकीने जाताना हे गोविंदा बेशिस्तपद्धतीने वाहनांचे भोंगे तसेच खेळण्यातील पिंपाणीचा आवाज करत जात आहेत. तर, अनेक ठिकाणी आयोजकांकडून देखील मोठमोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात येत आहे. यामुळे शहरात ध्वनीप्रदूषण होत आहे. या सर्व प्रकारामुळे ठाणेकरांमधून संताप व्यक्त होत आहे.