ठाणे – गेले काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर इच्छूक लोकप्रतिनिधी तयारीला लागले असल्याचे दिसत आहे. त्यात, क्लस्टरच्या देखील बैठका होण्यास सुरुवात झाली आहे. गेले चार वर्षे राजकीय गोंधळ आणि न्यायलयीन पेचामुळे निवडणूक रखडल्या होत्या. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार म्हणून क्लस्टरचे वारे वाहू लागल्याच्या चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.

वागळे इस्टेटमधील किसन नगर लोकमान्य नगर, यशोधन नगर, इंदिरा नगर तसेच शास्त्रीनगर या विभागांचा पुनर्विकास समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) च्या माध्यमातून व्हावा यासाठी गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात, रहिवाशांच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत अनेक बैठका देखील पार पडल्या आहेत. परंतू, या बैठका केवळ निवडणूका येताच आयोजित केला जात असल्याचा आरोप काही रहिवाशांकडून होऊ लागला आहे. गेले अनेक वर्षांपासून क्लस्टरच्या माध्यमातून आपण राहत असलेल्या परिसराचा पुनर्विकास होईल असे वाटतं होते. परंतू, आता केवळ या घोषणाच असल्याचे वाटतं आहे, अशी प्रतिक्रिया लोकमान्यनगर मधील एका रहिवाशाने दिली.

काही वर्षांपूर्वी क्लस्टरसाठी सर्वेक्षण करण्यात आले, प्रत्येकाच्या घराबाहरे सर्वेक्षण क्रमांक देखील टाकण्यात आले. परंतू, त्यानंतर क्लस्टरचा विषय पुन्हा बंद झाला होता. आता निवडणूका येताच क्लस्टरचा विषय पुन्हा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रितम शेवाळे या रहिवाशाने दिली आहे. अनेकांना क्लस्टर ही योजना पटलेली नसल्यामुळे त्यांचा या योजनेला तीव्र विरोध असल्याचे दिसत आहे.

गेले काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहू लागले आहेत. त्याचबरोबर इच्छूक प्रतिनिधींकडून विविध उपक्रम तसेच कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार, क्लस्टर या विभागांसाठी कसे महत्त्वाचे आहे, हे नागरिकांना समजावे त्यांना यासंदर्भात तांत्रिकरित्या माहिती मिळावी यासाठी गेले काही आठवड्यांपासून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, यशोधन नगर, शास्त्री नगर या भागात काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून क्लस्टरच्या बैठका होण्यास सुरुवात झाली आहे. परंतू, या बैठका केवळ मतदारांचे लक्ष वेधण्यासाठीच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.

काय आहे क्लस्टर योजना ?

एखाद्या विशिष्ट समूहाचा एकत्रितरीत्या विकास होणे म्हणजेच समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) असा क्लस्टरचा अर्थ होतो. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून जिवीतहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकीची घरे मिळणार आहेत.