ठाणे : एखादा गुन्हा केल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेले किंवा समाजमाध्यमांवर गुंडगिरीचे रील्स तयार करुन स्वत:ला ‘भाई’ समजणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगारांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी अशा ७० जणांची यादी तयार केली असून अशा गावगुंडगिरी करणाऱ्यांवर जरब बसावा यासाठी दर आठवड्याला त्यांच्या घरी जाऊन त्याची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचे पथक दर आठवड्याला घरी येऊन तपासणी करत असल्याने या गुंडांवर आणि त्याच्या साथिदारांवरही वचक बसू लागल्याचे पोलीस सांगतात.

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भाग येतो. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकूण ११ पोलीस ठाणे यामध्ये भिवंडी तालुका, गणेशपुरी, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, पडघा, शहापूर, तोकवडे आणि वाशींद या पोलीस ठाण्याचा सामावेश आहे. भिवंडी पासून ते थेट कसाऱ्या पर्यंत पोलिसांची हद्द मोडते. या हद्दीमध्ये रहिवासी आणि लघु उद्योगांच्या क्षेत्रांचाही भाग मोठ्याप्रमाणात आहेत. तसेच पोलीस ठाण्य्चाय हद्द देखील मोठ्या आहेत. काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून गावहद्दीत किंवा तालुक्यांमध्ये गुंडगिरी केली जाते. गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतरही अनेकदा त्यांची कारस्थाने कमी होत नसतात. अभिलेखावरील गुन्हेगार समाजमाध्यमावर रील्स बनविणे किंवा इतर माध्यमातून ते नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात.

या गुंड प्रवृत्तींवर वचक बसविण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक पथक स्थापन केले आहे. १८ कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी तीन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच ७० गुंड तसेच अभिलेखावरील काही गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार करण्यात आली. यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्याबद्दलची माहिती घेतात. तसेच त्यांच्या घरामध्ये तपासणी करतात. त्यांच्या घरात शस्त्रास्त्र आहेत का, तो कुठे गेला होता याची माहिती घेतली जाते. पोलिसांचे पथक येत असल्याने त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या इतर साथिदारांमध्येही भिती निर्माण होते असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकार सुरु केल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली भिती दूर होते. तसेच नागरििक पोलिसांना थेट संपर्क साधून एखादा गैरप्रकार सुरू असल्यास त्याची माहिती देत असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे ग्रामीण पोलीस दलात गुंड प्रवृत्तींवर वचक ठेवण्यासाठी हे पथक बनविले आहे. प्रत्येक तुकडीत १८ कर्मचारी आहेत. डाॅ. डी.एस. स्वामी, अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस.