ठाणे : शहरातील ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागाने १४ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. या पथकामार्फत गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम नुकतेच पुर्ण झाले असून या सर्वेक्षणानुसार शहरातील ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात ७३७२ अनाधिकृत बांधकामे असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक बांधकामे कळवा, दिवा भागात आहे तर, वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर भागात एकही बांधकाम आढळून आलेले नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
शीळ येथील २१ बेकायदा इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या बांधकामांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने शहरातील ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्याचे अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. यानंतर, खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागाने एक परिपत्रक काढले होते. त्यात ना विकास आणि हरित क्षेत्रातील हद्द ठरवून देण्यासाठी शहर विकास विभागाने १४ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने शहरातील ना विकास आणि हरित क्षेत्रातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले होते. हे काम नुकतेच पुर्ण झालेले आहे.
बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण
शहरातील हरित क्षेत्र आणि ना विकास क्षेत्रात तब्बल ७३७२ अनाधिकृत बांधकामे आहेत. यात कळवा विभागात सर्वाधिक म्हणजेच ४३६५ अनाधिकृत बांधकामे तर, त्या खोलाखाल दिव्यात १८२८ बांधकामे आहेत. तर वागळे आणि लोकमान्य नगर भागातील हरित आणि ना विकास क्षेत्रात एकही बांधकाम नसल्याची बाब समोर आली आहे. यातील काही बांधकामे ३० ते ४० वर्षापूर्वी तर, काही बांधकामे १० ते २० वर्षांपुर्वी उभी राहिली आहेत. या बांधकामांमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास करीत असल्याची माहिती सर्वेक्षणादरम्यान पुढे आली आहे. त्यामुळे या बांधकामांवर कारवाई करता येईल का किंवा त्यांना संरक्षण देता येईल का, याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा
ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ९०९ बेकायदा बांधकामे आढळून आली असून त्यापैकी २२७ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याने उर्वरित ६८२ बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे. असे असले तरी, या कारवाई आधी या बांधकामांचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशानसाने घेतला आहे. तसेच दिवा आणि मुंब्रा या शहरातील अनधिकृत बांधकामांना चाप बसावा यासाठी ठाणे महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची निर्मिती केली आहे. अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही. मात्र, अधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, रिक्त इमारत, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.