Thane News : ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसराचा रस्ता मीरा- भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावरील ठाणे ते घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. तर, घोडबंदर ते ठाणे या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम महिनाभरापुर्वी करण्यात आले होते. परंतु अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाहाणीनंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे (rajan vichare) यांनी रविवारी पाहाणी करत गंभीर आरोप केले आहेत.

घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावरील फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट पर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित केला आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. घाट परिसरातील चढणीवरचे खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून प्रचंड वाहतूक कोंडी होते. या मार्गिकेची दरवर्षी पावसाळ्यात दुरूस्ती करण्यात येते. यंदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम केले होते. दुसऱ्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु पाऊस सुरू झाल्याने हे काम रखडले होते. या रस्त्याची मास्टीक पद्धतीने बांधणी करण्यात आली होती. परंतु अवजड वाहतूकीमुळे डांबरी रस्ता टिकत नाही. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता काँक्रीट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वनविभागाकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले होते.

काही दिवसांतच रस्ता उखडला

गायमुख घाट रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नव्हती. परंतु, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने एका बैठकीत स्पष्ट केले होते. याच बैठकीत ठाणे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक सल्ला दिला होता. पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. यानुसार रस्त्याचे काम करण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, काही दिवसांतच हा रस्ता उखडल्याने नागरिकांना पुन्हा कोंडीचा सामना करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणाची बैठक घेऊन घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी प्राधिकरणांची कान उघाडणी केली होती. त्यानंतर गायमुख घाट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहाणी केली होती.

विचारेंनी केला गंभीर आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे (rajan vichare) यांनी रविवारी गायमुख घाट रस्त्याची पाहाणी करत गंभीर आरोप केले आहेत. या रस्त्याचा दुभाजक साडे चार ते पाच फुट उंच होता. मात्र, सातत्याने होणाऱ्या रस्ते कामामुळे हा दुभाजक आता दोन फुटांचा राहिला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. येथील चढण रस्त्यांवर अवजड वाहनांचा वेग कमी होतो आणि कोंडी होते. हा रस्ता खोदून बनविला तर चढण रस्ता कमी होईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही. परंतु इथे जाणून बुजून येथे पैशांचा गैरवापर केला जात आहे. या रस्त्यावर दर महिन्याला पंधरा दिवसांनी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असते. वर्षोनुवर्षे पैसे कमविण्यासाठी हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खड्डे बुजविणे नव्हे तर, खिसे भरण्याचे काम येथे सुरू आहे, असा आरोप विचारे (rajan vichare) यांनी केला आहे.