India vs Pakistan match : ठाणे : भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरून ‘ माझं कुंकू-माझा देश ‘ आंदोलन करणार आहे. या आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला सिंदूर पाठवणार आहेत, असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत म्हटले आहे. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत “पहिल्यांदा आपलं कुंकू सांभाळा” असा टोला लगावला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच, आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्याच्या निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना माहीती दिली. उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतला आहे. अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावनेविरुद्ध आहे. अजूनही २६ निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे, असे म्हणताय. पाकिस्तानचे कंबरडे मोडू असे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मॅचचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी १४ तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. ‘माझं कुंकू-माझा देश’ असा आंदोलन केलं जाईल. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टिका केली आहे.

नरेश म्हस्के यांनी लगावला टोला

“संजय राऊत यांच्या सल्ल्याने बालिश चाळे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही. हे बालिश चाळे बंद करा आणि आधी आपला पक्ष सांभाळा. तुमचे पदाधिकारी तुमचे कुंकू पुसून दुसऱ्याच घरी सुखाने नांदायला जात आहेत, असा टोला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला. आपल्याशी घटस्फोट का घेत आहेत. आपले कुंकू का पुसत आहेत, याचे आधी परिक्षण करा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंकू पाठवा, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

माझ्या खासदारकीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

एकूण सात लाख ३४ हजार मते मिळवून मी २ लाख १७ हजार मताधिक्याने विजयी झालो. देशभरात मताधिक्य मिळालेल्या १० मतदारसंघांपैकी ठाणे ही जागा आहे. राजन विचारे आणि त्यांच्या गटाला आपली हार पचली नाही. म्हणून खोट्या आरोपांवर आधारित याचिका कोर्टात दाखल केली, पण कोर्टाने दूध का दूध, पाणी का पाणी केलं. मी त्यांच्यासारखा अडाणी नेता नाही. विद्यार्थी दशेपासून आंदोलनात होतो. पक्षासाठी लाठ्या- काठ्या खाल्ल्या आहेत. कोर्टात दाखवलेला गुन्हा कोणता होता, हे विचारेनी स्पष्ट करावं. तो गुन्हा पक्षासाठी होता, चोरी वा भ्रष्टाचार नव्हता. कोर्टाने कोणतीही शिक्षा दिलेली नाही. उलट खोटे कागद दाखवणाऱ्यांचे खोटे उघड झाले. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य कोण, हे त्यांनी लोकांना विचारले होते. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हेच धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य असल्याचे ठाणेकरांनी दाखवून दिले, असे म्हस्के म्हणाले.