ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते, वनमंत्री गणेश नाईक यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. नाईक हे सातत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत असून त्याला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के प्रतिउत्तर देत आहेत. असे असतानाच, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार म्हस्के यांनी नाईक यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, संघटिका सरोज पाटील आणि शहर प्रमुख विजय माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्तर भारतीय सेल प्रमुख शशी यादव व इतर मान्यवर पदाधिकारी आणि प्रभागनिहाय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करा
या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी कशी करायची, प्रभागनिहाय निवडणूक पद्धती कशी आखायची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत झालेली विकासकामांची माहिती प्रत्येक घराघरात कशाप्रकारे पोहोचवायची, याबाबत खासदार म्हस्के यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आगामी निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांना केले.
भगवा फडकवण्याचा संकल्प
या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश मोठ्या प्रमाणात दिसून आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी केला, असे म्हस्के म्हणाले.
वो नवी मुंबई जीतकर ही जाएंगे
नाईक हे सातत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत असून त्याला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के प्रतिउत्तर देत आहेत. असे असतानाच, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार म्हस्के यांनी ” दुश्मन चाहे लाख कोशिश करे, जनता का प्यार छीन नहीं पाएंगे, शिंदे के नाम से जो जुड़े हैं, वो नवी मुंबई जीतकर ही जाएंगे” असे म्हणत नाईक यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.