ठाणे – जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात १ जूलै ते २१ जूलै या कालावधीत डेंग्यूचे तब्बल १३४ तर, मलेरियाचे १०५ रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातले आहेत. ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धुर फवारणी केली जात आहे. तर, या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ होते. विशेष करुन जून ते ऑक्टोबरमध्ये डासांच्या वाढीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या कालावधीत डेंग्यू मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटीसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते.
परंतू, असे असले तरी, शहरात डेंग्यु आणि मलेरिया रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत डेंग्यूचे १३४ तर, मलेरियाचे १०५ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात डेंग्यू ,मलेरियाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाचा वाढता संसर्ग लक्षात घेता काही शाळांमध्ये धुर फवारणी केली जात आहे.
आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम
जून ते ऑक्टोबर या कालावधीत डेंग्यू मलेरियासारखे संसर्गजन्य आजार वाढत असतात. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष अंमलबजावणी केली जाते. यामध्ये नागरिकांना कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली जाते. यात, आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे, पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवणे, प्लास्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करणे, गटार, नाल्यांची नियमित सफाई, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत, डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरणे, डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे असे आवाहन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येते.
१ जुलै ते २१ जुलै कालावधीतील डेंग्यू मलेरिया रुग्णसंख्या
महापालिका | मलेरिया | डेंग्यू |
ठाणे | ५१ | ८२ |
कल्याण डोंबिवली | १६ | ३२ |
उल्हासनगर | ०० | ०० |
भिवंडी | ०२ | ०१ |
नवी मुंबई</td> | ०२ | ०७ |
मीरा-भाईंदर | २३ | ०५ |
ठाणे ग्रामीण | ११ | ०७ |
एकूण | १०५ | १३४ |