ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे तो कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे. हाच मुद्दा संसदेत उपस्थित करत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

ठाणे शहर तसेच त्यापलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईच्या दिशेने अनेक प्रवासी जात असतात. याचबरोबर इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात कामानिमित्त येतात. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय होता प्रस्ताव

ठाणे रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्तावित करण्यात आले होते. या संदर्भात गेल्यावर्षी ठाणे महापालिका अधिकारी आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली होती. यावेळी आधुनिकीकरण कामाचे सादरीकरण करण्यात आले होते. यात सद्यस्थित असलेल्या ११ फलाटावर पूर्व आणि पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करणे, या डेकवर प्रवाशासांठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकिटघर, शौचालय आदी सेवासुविधा उपलब्ध करणे. डेक हा ठाणे पश्चिम आणि पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडणे, तसेच रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी बहुमजली वाहनतळ, तीन ते चार व्यावसायिक इमारतीचे बांधकाम रेल्वेमार्फत करणे, अशा कामांचा समावेश होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्ताव कागदावर

ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे २६ लाख आहे. रेल्वे हे येथील रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने ९४९ कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल फलाट क्रमांक १, फलाट क्रमांक ७ आणि ८ ला जोडेल, तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. रेल्वे मंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रस्तावांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल, अशी विनंती नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.