अंबरनाथ : अंबरनाथ, बदलापूर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी, वाढती लोकसंख्या आणि सतत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे दोन्ही शहरांना संथगती वाहतुकीचा फटका बसतो आहे. त्यातच आता मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यांवर होणारा वावर आणि त्यामुळे निर्माण होणारी अपघाताची भीती यामुळे वाहनचालक चिंताग्रस्त आहेत. अंबरनाथ, बदलापूर अशा दोन्ही शहरांमध्ये ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पश्चिम अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा टिळक पथ हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. कल्याण–बदलापूर राज्य महामार्गावरून अंबरनाथ रेल्वे स्थानक गाठण्यासाठी बहुसंख्य नागरिक या रस्त्याचा वापर करतात. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. अशा गर्दीच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गायी आणि इतर जनावरे दिवसरात्र बसलेली दिसतात. पालिका प्रशासनाने शहर सुशोभीकरणासाठी या मार्गालगत झाडे लावली. मात्र योग्य निगा राखली नसल्यामुळे ही झाडे आता मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. झाडांची हिरवीगार पानं मोकाट जनावरांसाठी चाऱ्याचे प्रमुख साधन ठरली आहेत. त्यामुळे जनावरे झाडांकडे आकर्षित होऊन रस्त्याच्या मधोमध फिरतात, पाला खाण्याच्या प्रयत्नात तिथेच थांबतात आणि बराच वेळ रस्त्यात आडवी होऊन रवंथ करत बसतात. त्यामुळे गाड्यांना थांबावे लागते आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात अचानक एखादे जनावर रस्त्यावर आले तर दुचाकीस्वार किंवा कारचालकाला अपघात होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पादचारीही भीतीच्या छायेत जात असतात.
बदलापूर शहरातही अशीच काहीशी स्थिती आहे. येथे बदलापूर गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर असेच मोकाट जनावरांचे जत्थे पाहायला मिळतात. बदलापूर गावात बोराडपाडा रस्त्यावर या मोकाट जनावरांची संख्या मोठी आहे. येथे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. तर अपघाताची भीती आहेच. जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती वाहनचालक आणि पादचारी व्यक्त करतात. शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरताना दिसतात, त्यामुळे यावर वेळीच कारवाई होण्याची मागणी होते आहे.
नागरिकांची मागणी काय
रस्ते, दुभाजकांवर गुजरान करणाऱ्या अशा मोकाट जनावरांची पालिकेने योग्य व्यवस्था करावी. तसेच रस्त्यालगत लावलेल्या झाडांची नियमित छाटणी करून जनावरांना आकर्षित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. तर उघड्यावर टाकला जाणारा कचरा, त्यावर गुजरान होणारे मोकाट जनावरे यांच्यासाठी योग्य पुनर्वसन केंद्र केल्यास त्यांचा प्रश्न मिटेल अशी मागणी नागरिक करतात.