Thane News : ठाणे : टेंभीनाका चौकात नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवासाठी जय अंबे नवरात्रौत्सव मंडळाकडून मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल (आज) ९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत लागू असतील.
(Thane Traffic update) ठाण्यातील टेंभीनाका येथे श्री जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी हा नवरात्रौत्सव सुरु केला होता. त्यावेळी ठाण्यात नागरिकरण तुलनेने कमी होती. ठाणे, मुंबई, उपनगरासह विविध जिल्ह्यातून या उत्सवासाठी नागरिक टेंभीनाका येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. यावर्षी २२ सप्टेंबरला घटस्थापना असल्याने आजपासून येथे मंडप उभारणीचे काम मंडळाच्या वतीने हाती घेतले आहे. त्यामुळे टेंभीनाका चौकातून कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुकीसाठी खुला असलेला मार्ग बंद करण्यात आला आहे.
असे आहेत वाहतुक बदल
- ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून टाॅवर नाका मार्गे आणि दगडीशाळा चौकातून वीर सावरकर रोडने टेंभीनाका, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना, बसगाड्यांना टेंभीनाका येथील सुयज उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सुयज उपाहारगृह येथून उजवे वळण घेऊन ठाणे महापालिका शाळा क्रमांक १७, कोर्टनाका चौक मार्गे वाहतुक करतील.
- कोर्टनाका येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना धोबीआळी जवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबीआळी चौक, डाॅ. सोनुमिया रोड, धोबीआळी मशीद, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून वाहतुक करतील.
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मीनाताई ठाकरे चौक, जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गे टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जिल्हा शासकीय रुग्णालय, जीपीओ मार्गे, कोर्टनाका चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल ९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत दिवसभर लागू असतील. त्यामुळे या पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहने उभी करण्यास बंदी
दगडी शाळा, सेंट जाॅन बॅपिस्ट शाळा, दांडेकर ज्वेलर्स, उत्तम मोरेश्वर आंंग्रे, अहिल्यादेवी उद्यान, धोबीआळी परिसर, डाॅ. सोनुमिया रोड ते जिल्हा शासकीय रुग्णालय भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी असेल.