बदलापूर : मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारणाऱ्या शहरातील लोकसंख्येची भविष्यातील तहाण भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोशीर आणि शिलार ही धरणे आता दृष्टीपथात आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने या दोन्ही धरणांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर केल्या आहेत. पोशीर धरणासाठी २ हजार १३५ कोटी रूपयांची तर शिलार धरणासाठी १ हजार ६६७ कोटी रूपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम ६० महिने अर्थात ५ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मुंबई महानगर प्रदेशात शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येला पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी नव्या स्त्रोतांची उभारणी मात्र वेगाने होताना दिसत नाही. ठाणे आणि उपनगरांना पिण्याच्या पाण्याचा नवा स्त्रोत म्हणून काळू धरणाची उभारणी प्रस्तावीत आहे. मात्र १३ वर्षांनंतरही रखडलेली आहे. त्यासाठी निधीची तरतूद असली तरी प्रत्यक्ष कामात अनेक अडथळे आले. त्याचवेळी रायगाड आणि ठाणे जिल्ह्यातील संयुक्तपणे विभागलेले उल्हास खोरे मात्र याबाबत दुर्लक्षित होते. उल्हास नदीवर एकही धरण नाही. भौगोलिक रचना पोषक नसल्याने नदीवर थेट धरण बांधण्यात मर्यादा येतात. मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. उल्हास खोऱ्यात सरासरी ५ हजार मिलीमीटर पाऊस दरवर्षी पडतो.

हे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. या कर्जत ते ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगरपर्यंत उल्हास नदीला चिल्हार आणि पोशीर या उपनद्या येऊन मिळतात. या नदीवर धरण बांधून त्याचा वापर करण्याचा प्रस्ताव होता. चिल्हार आणि पोशीर नद्यांवर आता राज्य सरकराने अनुक्रमे शिलार आणि पोशीर ही धरणे प्रस्तावित केली होती. पोशीर धरणाची क्षमता १२.३४ टीएमसी तर शिलार धरणाची क्षमता ६.६१ टीएमसी इतकी असणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या कोकण पाटबंधारे विभागाने या दोन्ही धरणांच्या उभारणीसाठी आता निविदा जाहीर केली आहे. पोशिर प्रकल्प आणि शिलार प्रकल्पातील धरण, सांडवा प्रणाली आणि पाणीपुरवठा तसेच विद्युत विमोचक आणि इतर अनुषंगिक बाबींचे बांधकाम करण्यासाठी या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कामासोबकच केंद्र शासन, वन व पर्यावरण तथा वातावरणीय बदल विभागाकडून वनजमिन वळतीकरणास मान्यता प्राप्त करणे आणि खाजगी भूसंपादन प्रस्ताव तयार करणे या कामांचाह यात समावेश करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कामाचे कार्यादेश दिल्यानंतर ६० महिन्यात अर्थात पाच वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय हे काम पूर्ण झाल्यास २०३० पर्यंत या धरणांचे पाणी शहरांना मिळू शकते.

पूरही थांबणार

गेल्या काही वर्षात उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील बदलापूर, कल्याण, उल्हासनगर या तालुक्यांतील शहरे आणि गावांना मोठा फटका बसला. उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या पोशीर आणि चिल्हार नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवते. धरणांमुळे पूरस्थितीवरही नियंत्रण मिळवता येईल.

पोशीरची पाणी क्षमता – १२.३४ टीएमसी, निविदा किंमत – २ हजार १३५ कोटी

शिलारची पाणी क्षमता – ६.६१ टीएमसी, निविदा किंमत – १ हजार ६६७ कोटी

या शहरांना फायदा

पोशीर आणि शिलार धरणांच्या उभारणीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई महापालिका क्षेत्र, पनवेल, कुळगाव बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांना पाणी मिळेल.