ठाणे : उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात ठाकरे गटाने ‘बाप तो बाप रहेगा’अशा आशयाचे बॅनर झळकविले आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांवर वाद सुरू आहे. त्यातच आता हे बॅनर चौका- चौकात लागत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात सर्वाधिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जस-जशा जवळ येऊ लागल्या आहे. तस-तशा आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर वाचाळवीर असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाने राजन विचारे यांच्या एका वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यातील चौका-चौकांमध्ये फलक उभारले होते. त्यापैकी काही बॅनर विचारे यांच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले तर, लईसवाडी भागतील बॅनर काढण्यासाठी पोलिस गेले. त्यावेळी शिंदेच्या युवासेनेचे कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण होते.

‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही. आज या घटनेला शंभर दिवस झाले, २७ कुटुंब उध्वस्त झाली आहेत आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज? असे राजन विचारे यांनी विधान केले होते. त्यातील ‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का’ या विधानाचा निषेध करण्यासाठी शिंदेच्या युवा सेनेने विचारेंविरोधात बॅनर लावले होते. त्यात विचारे यांच्या फोटोवर फुल्ली मारण्यात आली होती. तर, निषेध, निषेध..उबाठाच्या अशा देशद्रोही राजनचा धिक्कार. ना आदर, ना विचार, मनात आहेत फक्त ‘अ’ विचारे असा मजकूर बॅनरवर होता.

हे फलक ठाकरे यांच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर तणावाचे वातावरण झाले होते. राजन विचारे यांनी गुरुवारी एक पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केले. या पत्रामध्ये त्यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर काँग्रेसमध्ये जाण्यापासून रोखल्याचे राजन विचारे यांनी पत्रात म्हटले होते.

टेंडर सेटर म्हणून तुझी ख्याती सर्वदूर आहे. वाचाळवीर तुला बोललो हे खरंच आहे, पण वाचाळवीर बोलल्याने तुला एवढ्या मिरच्या झोंबल्या? अरे नरेश, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले आणि तुला महापौर खुर्चीत बसवले याची तरी जाणीव ठेवशील की नाही. खाल्या मिठाला जागशील की नाही?.. अरे ज्या ताटात खाल्लेस त्या ताटात घाण करणे अशी तुझी ओळख अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात झाली आहे असेही पत्रात लिहीले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजन विचारे यांचा आज, शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने म्हस्के यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच, त्यासोबतच नंतर पत्राचे उत्तर देऊ असा इशाराही विचारे यांना दिला. याच दरम्यान आता, ठाकरे गटाच्या घोडबंदर भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजन विचारे यांचे फलक झळकविले आहेत. यामध्ये त्यांनी ‘बाप तो बाप रहेगा’असे म्हटले आहे. हे बॅनर सर्वांचे लक्ष वधून घेत होत आहेत. बॅनरवर राजन विचारे यांचे छायाचित्र आहे. तसेच त्यांना यामध्ये शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.