scorecardresearch

अंबरनाथ : आधीच पलावाची कोंडी, त्यात खड्ड्यांचा जाचकाटई ; बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे

बदलापूर ते ठाणे किंवा नवी मुंबई हा प्रवास मनस्ताप देणारा ठरू लागला आहे

अंबरनाथ : आधीच पलावाची कोंडी, त्यात खड्ड्यांचा जाचकाटई ; बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे

गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर ते ठाणे किंवा नवी मुंबई हा प्रवास मनस्ताप देणारा ठरू लागला आहे. डोंबिवलीजवळच्या काटई नाक्यापासून पलावा हे अवघे काही मीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास खर्ची घालावे लागतात. त्यात काटई ते बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे उगवल्याने प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो आहे. काटई नाक्यापासून ते थेट बदलापुरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे प्रवास जीवघेणा झाला आहे.

गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ या शहरांच्या विस्तारीत भागात, खोणी, नेवाळी या गावांच्या शेजारी आणि वेशीवर गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बदलापूर काटई राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आहे. ठाणे – नवी मुंबई किंवा मुंबईला जाण्यासाठी काटई – शिळफाटा या रस्त्याचा सर्वाधिक वापर होतो. एकीकडून बदलापूर, अंबरनाथ तर दुसरीकडे कल्याण आणि डोंबिवली भागातून काटई नाका येथे वाहनांची गर्दी एकटवते. त्यामुळे काटई भाग वर्दळीचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे रस्त्याच्या कॉंक्रिटीकणाचे काम सुरू आहे. त्यातच उर्वरित रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील प्रवास वेळखाऊ झाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत काटई ते शिळफाटा या भागात वाहतूक कोंडी होती. पलावा परिसरातील अरूंद उड्डाणपूल या कोंडीत भरर घातल असतो. मात्र अंबरनाथ आणि बदलापूर शहरातून या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागतो आहे.

अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासाला आता दीड ते दोन तास –

पलावा परिसरातील कोंडीत अडकण्यापूर्वी वाहनचालकांना बदलापूर ते काटई हा खड्ड्यातला प्रवास करावा लागतो. बदलापूर शहराच्या वेशीपासून खड्ड्यांची मालिका सुरू होते. पुढे अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर, विस्तारीत पाले, नेवाळी, खोणी ते थेट काटई पर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांची लांबी रूंदी इतकी मोठी आहे की त्यातून दुचाकी अथवा चारचाकी वाहन नेणे कसरत करण्यासारखे आहे. काही भागात रस्ता चांगला असला अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा तोल जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक गावकऱ्यांनाही बसतो. या खड्ड्यांच्या प्रवासातून सुटल्यानंतर पुढे काटई नाक्यापासून हे प्रवासी पुन्हा पलावा येथील कोंडीत अडकतात. त्यामुळे अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासाला आता दीड ते दोन तासांचा वेळ लागतो आहे. परिणामी वाहनचालक रेल्वे प्रवास करण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.