ठाणे : गेल्या वर्षी बदलापूर येथे शाळेतील चिमुरडींसोबत गैर प्रकार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांना विविध निर्देश देण्यात आले होते. परंतु ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील शाळेकडून नियमांचे पालन होत नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. येथील विद्यार्थी आणि विद्यार्थींनीसाठी एकच स्वच्छता गृह असून स्वच्छता गृहाचे दरवाजे देखील तुटलेल्या अवस्थेत आहे.

विशेष म्हणजे, या शाळेची दुरूस्ती सुरू आहे. त्यामुळे येथील कामगार देखील या स्वच्छता गृहाचा वापर करतात. त्यामुळे एखादा गंभीर प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

टेंभी नाका येथे ठाणे महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत पहिली ते १० वी पर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये या शाळेची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. अनेक वर्ग खोल्यांमध्ये छत गळते आहे. इमारत जीर्ण झाल्यानंतर ठाणे महापालिकेने या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असतानाच या दुरुस्त्या केल्या जात आहे. शिक्षणात व्यत्यय येतो.

त्या सोबतच, इमारतीमध्ये ठिकठिकाणी लोखंडी सळया, सीमेंटच्या गोण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यासोबत गंभीर अपघाताची भिती व्यक्त केली जाते. पहिली ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना एकच स्वच्छतागृह आहे. त्यामुळे विद्यार्थीनींच्या मनात भितीची भावना निर्माण होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या स्वच्छता गृहांतील आतील दरवाजे देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. तर मुख्य प्रवेशद्वारच गायब आहे.

जीर्ण इमारतीची दुरूस्ती करण्यासाठी नेमण्यात आलेले कामगार देखील याच स्वच्छता गृहाचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.

नियमानुसार शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना वेगवेगळे स्वच्छता गृह, स्वच्छ पाण्याची सोय, स्वच्छता असणे आवश्यक आहे. शाळेत सीसीटीव्ही देखील लावणे गरजेचे आहे. जर मुला-मुलींना एकच स्वच्छता गृह असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. – विपुल शहा, उपाध्यक्ष, फोरम फॉर फेयरनेस इन एज्युकेशन.