ठाणे : घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील ठाणे महापालिकेच्या मैदानाची भिंत दुरूस्ती आणि रंगरंगोटीचे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेऊन त्यासाठी निविदा काढली आहे. प्राप्त निविदा २९ सप्टेंबर रोजी उघडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते.

मात्र, त्याआधीच मैदानाच्या भिंतीला रंगरंगोटी करण्यात आल्याचा प्रकार दक्ष नागरिक अशोक सोनावले यांनी उघडकीस आणला आहे. या कामाची चौकशी करून त्यातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध नागरी प्रकल्प राबवण्यात येतात. नागरिकांच्या हितासाठी हे प्रकल्प राबविण्यात येत असले तरी या प्रकल्पांच्या कामाविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात. काही प्रकल्पांची कामे दर्जेदार आणि चांगली होतात. तर, काही प्रकल्पांच्या कामांच्या दर्जाविषयी तर काही वेळेस कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो. काही वेळेस मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी निविदेत अटी व शर्ती टाकून निविदा काढल्या जात असल्याचा आरोपही यापूर्वी झालेला आहे. असे असतानाच, आता निविदा अंतिम होण्यापूर्वीच त्यामधील प्रस्तावित काम पूर्ण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील एका शाळेलगत ठाणे महापालिकेचे मैदान आहे. या मैदानाच्या एका बाजुच्या भिंतीची दुरुस्ती, नूतनीकरण करणे आणि सर्व भिंतीची रंगरंगोटी करणे अशा कामासाठी पालिकेने ऑनलाईन निविदा मागविल्या होत्या. १९ सप्टेंबरला ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तर, निविदा भरण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत होती. प्राप्त निविदेतून २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता निविदाकार प्रतिनिधींसमोर निविदा उघडण्यात येतील, असे पालिकेने निविदा प्रसिद्ध जाहिरातीत म्हटले होते.

परंतु ही निविदा अंतिम होण्यापूर्वीच रंगरंगोटीचे काम उरकण्यात आलेले आहे. सुमारे २५ लाखांचे हे काम असण्याचे सांगण्यात येत आहे, असे दक्ष नागरिक अशोक सोनावले यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि त्यातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात ठाणे महापालिकेचे उप कार्यकारी अभियंता प्रविण राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. तर, कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.