ठाणे – ठाण्यात लवकरच ‘हापूस पार्क’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात केली.

या उपक्रमामागे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांच्या एका भावनिक आठवणीची प्रेरणा आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते की, ठाणे शहरात पूर्वी हापूस आंब्याच्या बागा होत्या. त्या नामशेष झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेत, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ ठाणे महापालिका आयुक्तांना ‘हापूस पार्क’ उभारण्याचे निर्देश दिले. आता या कल्पनेला प्रत्यक्ष आकार दिला जात आहे.याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गडकरी रंगायतनच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना दिली.

यावेळी त्यांनी ठाणे शहरातील इतर पर्यावरणपूरक प्रकल्पांचाही उल्लेख केला. शहरातील सर्व तलावांचे सुशोभीकरण आणि संवर्धन केले जात आहे. याशिवाय, कोलशेतमध्ये ‘नमो सेंट्रल पार्क’सारखा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्यान प्रकल्प उभा केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने घोडबंदर येथील गायमुख परिसरात चौपाटी आणि शहरी जंगल उभारण्यात आले आहे. त्यामुळे “शहरी जंगल पाहायचं असेल, तर ठाण्यात यावं लागेल,” असे विधान शिंदे यांनी ठामपणे केले.

याचबरोबर, ठाण्यात सेंद्रिय शेतीचा एक मोठा प्रकल्पही यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. हे सर्व प्रकल्प ठाणे शहराला एक नवे हरित आणि पर्यावरणपूरक रूप देत आहेत. ‘हापूस पार्क’ हा या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.