ठाणे : ठाणे शहरातील वाहतूकीला शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी गुरूवारी कॅडबरी सिग्नलजवळ सीसीटिव्ही कॅमेरे बसविले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ९५० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ४५३ दुचाकीस्वारांचा समावेश आहे. अशाचप्रकारचे कॅमेरे आणखी १४ चौकात येत्या काही दिवसांत लावले जाणार आहेत.

भरधाव वेगाने गाडी चालवणे, सिग्नलवरील थांब रेषा ओलांडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट दुचाकीने प्रवास करणे अशाप्रकारे वाहनचालक नियम मोडतात. अनेक वाहनचालक हे वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताच्या घटना घडतात. अशाचालकांवर कारवाई व्हावी आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीसाठी कॅडबरी सिग्नल जवळ सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे ९५० वाहनचालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

ई चलन अंतर्गत दंडाची कारवाई

ठाणे शहरातील लोकसंख्या तसेच वाढत्या वाहतूकीचा ताण लक्षात घेऊन शहराच्या सुरक्षिततेसाठी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. येत्या काही दिवसात शहरातील महत्वाच्या १४ जंक्शनवर ही अशाच प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. कॅडबरी जंक्शनवरील सीसीटिव्ही कॅमेरे ठाणे वाहतूक पोलिसांच्या अद्ययावत नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. या कक्षात २० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील हे कर्मचारी सीसीटिव्हीच्या आधारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ई चलन अंतर्गत दंडाची कारवाई करणार आहेत.

एआय-आधारित प्रणाली

इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही एआय-आधारित प्रणाली असून ती २४ तास कार्यान्वित असते. यात हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांद्वारे सिग्नलवरील थांब रेषा ओलांडणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, मार्गिका नियमाचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे वाहतुक उल्लंघन आपोआप कॅमेऱ्यात टिपले जात आहेत. नोंद झालेली माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षात पाठवली जाते, तेथे ती प्रक्रिया करून वाहन मालकाशी जोडली जाते आणि त्यानंतर चलन जारी केले जाते.

पहिल्याच दिवशी कारवाई

कॅडबरी सिग्नल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कॅमेऱ्यांच्या आधारे नियम मोडणाऱ्या ९५० जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ४५३ दुचाकीस्वारांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत आणखी १४ ठिकाणी देखील अशाच पध्दतीने कॅमेरे बसविले जात आहेत, अशी माहिती ठाणे वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.