ठाणे : ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला गजानन महाराज चौकातून ठाणे स्थानकाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा रस्ता सतत रिक्षा तसेच इतर वाहनांनी गजबजलेला असतो. परंतु या चौकातील प्रवास आता नागरिकांना नकोसा वाटू लागलाय. कारण, या चौकातून होणारी रिक्षा चालकांची बेशिस्त वाहतूक. रिक्षा चालक कोंडी झाल्यानंतर मिळेल त्या जागेतून रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे गुंता वाढून वाहतूक ठप्प होते. कोंडी झाल्यावर बाजूच्या विरुध्द मार्गिकेवरून रिक्षा पुढे नेत असल्याने अपघातांची भीती निर्माण झाली आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते ठाणे स्थानक भागाला जोडण्यात आलेले आहेत. हे सर्व रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अपुरे पडत आहेत. त्यातच विशेषता शेअर रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे कोंडी होत आहे. ठाण्यातील गजानन महाराज चौकात हे चित्र दररोज सकाळ आणि सायंकाळी दिसून येते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि ठाणे स्थानक परिसराला जोडण्यात आलेल्या गजानन महाराज मंदिर चौकात चार रस्ते येऊन मिळतात. त्यात राम मारुती रोड, तीन पेट्रोल पंप, दगडी शाळा आणि चंदनवडी सिग्नल या भागातून येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहतुकीचे नियोजन होत नाही आणि त्यामुळे कोंडी होते.
गजानन महाराज चौकात सकाळी ८.३० ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० पर्यंत वाहतुकीची वर्दळ असते. याच दरम्यान कोंडी होते. कोंडी झाल्यानंतर या चौकात रिक्षा चालकांची बेशिस्त वाहतूक पाहायला मिळते. रिक्षा चालक कोंडी झाल्यानंतर मिळेल त्या जागेतून रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे गुंता वाढून वाहतूक ठप्प होते. कोंडी झाल्यावर बाजूच्या विरुध्द मार्गिकेवरून रिक्षा पुढे नेत असल्याने अपघातांची भीती निर्माण झाली आहे. या भागातील गजानन महाराज मंदिरात अनेक नागरिक येत असतात, त्यांना कोंडीमुळे रस्ता ओलांडणे शक्य होत नाही.
ठाणे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातील अनेक अधिकारी याच चौकातून प्रवास करतात. अनेकदा त्यांनाही या कोंडीचा फ़टका बसतो. काही वेळेस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेले पोलीस कर्मचारी वाहनातून उतरून वाहतूक कोंडी सोडविताना दिसून येतात. याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलीस धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चौकात उभे राहतात. या नंतर काही मिनिटात कोंडी कमी होते.