ठाणे – ठाण्याच्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक आणि विश्वस्त गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केशवसृष्टी पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या ११ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा संस्था येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास बृहन्मुबई महापालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉक्टर प्राची जांभेकर यांची उपस्थिती असणार आहे.
ठाण्यात विद्यादान सहाय्यक मंडळ हे गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काम करते. मंडळाच्या संस्थापक आणि विश्वस्त गीता शहा या ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ‘विद्यादान’ १५ ऑगस्ट २००८ रोजी संस्थेची स्थापना केली. ‘सक्षम विद्यार्थी – सक्षम राष्ट्र’ या ब्रीदवाक्याने त्यांनी कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्यांच्या शिक्षणाबरोबरच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठीही ही संस्था कार्यरत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक पालक-मार्गदर्शक निवडला जातो, जो त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतो. सध्या असे ५० पालक-मार्गदर्शक कार्यरत असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, निवासी, आहार आणि वैद्यकीय खर्च हा या संस्थेतर्फे केला जातो. आतापर्यंत १२,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या संस्थेच्या माध्यमातून झाला आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंते, वकील, परिचारक, तंत्रज्ञ, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक आणि वास्तुविशारद यांचा समावेश आहे.
सध्या ‘विद्यादान’ संस्थेच्या ६ शाखा, ८ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या आणि ११०० माजी विद्यार्थी स्वयंसेवकांच्या माध्यमातून ३५ जिल्ह्यांतील सुमारे ८५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काम सुरू आहे. दरम्यान या कार्याच्या पार्श्वभूमीवर विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक आणि विश्वस्त गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केशवसृष्टी पुरस्कारासाठी विविध सामाजिक संस्थांची माहिती घेऊन आणि प्रत्यक्ष भेटीनंतर निवड केली जाते. यावर्षीच्या निवड समितीत डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, रश्मी भातखळकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अर्चना वाडे, सुनयना नटे, ॲड. सुनीता तिवारी, राधा पेठे, शुभदा दांडेकर आणि सीमा उपाध्याय यांचा समावेश होता. या समितीच्या अध्यक्षा अमेया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीच्या पुरस्काराची निवड करण्यात आली.
पुरस्कार केव्हा आणि कुठे
हा पुरस्कार समारंभ शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता, ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा संस्था, डॉ. मूस रोड, तलावपाळी जवळ येथे संपन्न होणार आहे.