ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर ते बदलापूर या शहरांत सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरीही या कामास अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे शहरावर सीसीटीव्हीच्या नजरेची अद्यापही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. मागील काही वर्षांपासून आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. बालक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच सोनसाखळ्या चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारखेही गुन्हे घडत असतात. ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेने काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु हे सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तसेच त्यांची दृष्यमानताही चांगली नाही. तर, कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात स्मार्टसिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटिव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली वगळता ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सहा हजार ५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास मंजूरी मिळाली असली तरीही त्याची निविदा प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. त्यामुळे आता हा प्रकल्प केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी या प्रकल्पाची निविदा काढली जाऊ शकते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – कल्याण, मुरबाड येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू

कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य

यामध्ये स्थिर, वर्तुळाकार फिरणाऱ्या कॅमेऱ्यांचा सामावेश असेल. तसेच दूरवरून आणि अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे देखील मुख्य चौकात बसविण्यात येणार आहे. वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेऱ्यांचाही सामावेश असेल. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडे असेल. तसेच ते नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ठाण्याच्या काही भागात उद्या पाणी नाही

कोणत्या भागात किती कॅमेरे?

शहरे ठिकाणे – सीसीटीव्हींची संख्या

ठाणे ते दिवा – ३,१६३

भिवंडी- १,३४७

उल्हासनगर ते बदलापूर – १,५४१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण – ६,०५१