कल्याण : टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना गेल्या आठवड्यात हटवूनही त्यांनी पुन्हा चोरूनलपून रेल्वे स्थानक भागात बस्तान बसवण्यास सुरूवात केली होती. या फेरीवाल्यांच्या हातगाड्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या तोडकाम पथकाने सामानासह जागीच तोडून टाकल्या. याशिवाय टिटवाळा परिसरात सुरू असलेली बेकायदा बांधकामांवरची मोहीम दररोज सुरू असून, टिटवाळा रेल्वे स्थानक भाग, मोहिली रस्ता भागात सुरू असलेल्या बेकायदा चाळी, गाळे, जोत्यांची बांधकामे तोडकाम पथकाने दोन दिवसात भुईसपाट केली.
या दररोजच्या तोडकाम कारवाईमुळे टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील बस्तान ठोकणारे फेरीवाले, भूमाफिया हैराण आहेत.

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात मागील अनेक वर्ष राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नव्हती. बहुतांशी फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त फेरीवाला हटाव पथक, तोडकाम पथक घेऊन रेल्वे स्थानक भागात पोहचले की काही राजकीय मंडळी फेरीवाल्यांवर कारवाई करू नये म्हणून अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात मज्जाव करत होती. त्यामुळे टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना अभय मिळत होते. आपल्यावर कधीच कारवाई होणार नाही असा विचार करून फेरीवाल्यांना टिटवाळा पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय सुरू केले होते.

फेरीवाल्यांची ही बस्ताने गेल्या आठवड्यात कोणत्याही दबावाला न झुगारता साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केली होती. तरीही काही फेरीवाले पुन्हा रेल्वे स्थानक भागात येऊन व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्यावर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तोडकाम पथक घेऊन टिटवाळा रेल्वे स्थानक गाठले. तेथे त्यांनी फळ, भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या जागीच जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकल्या. ही कारवाई सुरू झाल्यावर फेरीवाले आपले हातगाड्या, ठेले, सामान सोडून फौजदारी कारवाई होईल या भीतीने पळून गेले. काही व्यापाऱ्यांनी भूमाफियांच्या आशीर्वादाने व्यापारी गाळ्यांची गुपचूप उभारणी रेल्वे स्थानक भागात सुरू केली होती. हे गाळे तोडकाम पथकाने तोडून टाकले. या कारवाईमुळे नेहमीच फेरीवाल्यांनी गजबजलेला रेल्वे स्थानक परिसर आता फेरीवाला मुक्त झाला आहे. या भागातील वाहतूक कोंडी त्यामुळे कमी झाल्या असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

मोहिली रस्ता भागात भूमाफियांनी भातशेतीमध्ये भराव करून बेकायदा चाळी उभारणीसाठी जोत्यांची बांधणी केली होती. ही जोती आणि या भागात नव्याने उभारलेल्या बेकायदा चाळी तोडकाम पथकाने घणाचे घाव आणि जोर लावून जमीनदोस्त केल्या. या ठिकाणी वाहन जाण्यास रस्ता नसल्याने ठेकेदाराच्या कामगारांनी ही कारवाई केली. टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांवर दररोज पालिकेच्या अ प्रभागाकडून आक्रमक कारवाई सुरू असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. मागील पंचविस वर्षात अशाप्रकारची कधी कारवाई आम्ही पाहिली नव्हती. ही कारवाई यापूर्वीच झाली असती तर टिटवाळा, मांडा, बल्याणी, बनेली परिसरात बेकायदा चाळी उभ्याच राहिल्या नसत्या, असे नागरिक सांगतात.