ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून या समस्येमुळे हैराण झालेल्या कळवेकरांनी पालिकेच्या प्रभाग समितीवर धडक दिली. ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्यावतीने का हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाण्यातच माणसे राहतात का, असा प्रश्न प्रशासनाला विचारला.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.
कळवा, खारीगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढे सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही. तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे, ते गढूळ स्वरूपाचे आहे. ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे, असा आरोप करत त्याचा निषेधार्थ हे आंदोलन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने मंगळवारी केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळेस आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला. या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
एकीकडे ठाण्यात उड्डाणपुलांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज जर ठामपाला भागवता येत नसेल तर कसे होणार, ठाण्यात जास्त पाणी दिले जात असेल आणि कळव्याला पाणी दिले जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसे राहतात का, असा प्रश्न नताशा आव्हाड यांनी उपस्थित केला. कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी, हा मोर्चा फक्त झाकी आहे, मुख्य आंदोलन बाकी आहे, असा इशारा दिला. तर, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी, ठाण्यात अनधिकृत बांधकामांना द्यायला पाणी आहे. पण, नागरिकांसाठी पाणी नाही, हे खेदजनक आहे. आज कार्यालयात खुर्च्या उबवणारे हे अधिकारी जर पाणी देऊ शकत नसतील तर त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही, असे म्हटले.