कल्याण: कल्याण, डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठीचा चेन्नई पॅटर्न कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत राबविण्यास प्रारंभ झाला आहे. चेन्नई पॅटर्न राबविणारी सुमित एल्को प्लास्ट कंपनी आणि कल्याण डोंंबिवली पालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा स्वच्छतेचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ही दोन्ही शहरे कचरा मुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

सुमित एल्को प्लास्ट कंपनीकडून देशात चेन्नई येथे हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चेन्नई शहर कचरा मुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल क्रमांकावर आले आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे नेहमीच बदनाम झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेत हा प्रकल्प राबविण्यासाठी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील हा पहिलाच स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न प्रकल्प कल्याण डोंंबिवलीत राबविला जात आहे.

कल्याणमधील पालिकेच्या ड, जे, आय आणि डोंबिवलीतील फ, ह, ग, ई प्रभागांमधील कचरा सुमित कंपनीच्या माध्यमातून उचलला जाणार आहे. सर्वाधिक कचरा तयार होणाऱ्या प्रभागांंची यासाठी निवड करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी एकूण ४५ मापदंड ठरवून देण्यात आले आहेत. त्या मापदंडाप्रमाणे सुमित कंपनीने कचरा उचलायचा आहे. हे सर्व मापदंड पूर्ण करून कचरा उचलला गेला तरच त्याचे देयक कंपनीला पालिकेकडून अदा केले जाणार आहे. जेवढा कचरा उचलला, तेवढेच देयक, असे या प्रकल्पाचे सूत्र आहे, असे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. या प्रकल्पाची कालमर्यादा दहा वर्षाची आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ६०० टनाहून अधिक कचऱ्याचे नियोजन केले जाणार आहे. कचरा उचलणे ते विल्हेवाट लावीपर्यंत एकूण ३५० हून कचरा वाहू वाहने दररोज शहराच्या विविध भागात धावणार आहेत. उंबर्डे, बारावे येथे कचरा नेण्यापूर्वी तो शहरातील चार ते पाच कचरा संकलन केंद्रावर एकत्रित केला जाईल. त्या प्रभागातील कचरा त्या भागातच विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आठवडाभर २४ तास ही कचरा संकलन, विल्हेवाटीची प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.

दररोज साडे चार लाख घरे, ५० हजार आस्थापनांमधून कचरा उचलला जाईल. झोपडपट्टी, चाळींमधील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र तुकड्या काम करणार आहेत. कचऱ्याची तक्रार आली तर नियंत्रण कक्षातून त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. प्रत्येक कचरा वाहू वाहनावर जीपीएस यंत्रणा आहे. या प्रकल्पात लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

कल्याण, डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका करेल. दररोज ४५ मापदंड पूर्ण करून कचरा उचलण्याची प्रक्रिया होणार असल्याने ही दोन्ही शहरे लवकरच कचरामुक्त आणि स्वच्छतेमध्ये अव्वल होतील. – अभिनव गोयल, आयुक्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीर्घकालीन बदलाची प्रक्रिया करण्याचे काम आम्हाला मिळाले आहे. अभिमान वाटेल अशी कल्याण डोंंबिवली शहरे स्वच्छतेच्या बाबतीत करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. -अमित साळुंखे, संचालक, सुमित ग्रुप.