ठाणे : पाचपाखाडी भागातील रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या नरवीर तानाजी मंडळाच्या गणेशोत्सवाने सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांमुळे सर्वत्र प्रसिद्धी मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जात असला तरी, त्यांनी हा उत्सव सुरू केलेला नाही. काही तरुणांनी १९७९ साली विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याला डॉ. आव्हाड यांनी सक्रिय पाठबळ देत अधिक व्यापक रूप दिले. मंडळात त्यांनी कार्यकर्ता ते मुख्य सल्लागार अशी उल्लेखनीय वाटचाल केली आहे.
अवघ्या २६९ रुपयांच्या वर्गणीतून सुरू झालेल्या या उत्सवाचा खर्च आज २० ते २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उत्सवाने ठाणेकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरथ आणि सल्लागार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ उत्सव साजरा करत आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य उदय मोरे यांनी दिली.
मंडळात आव्हाड यांची कार्यकर्ता म्हणून एन्ट्री
दांडेकर कॉलनीसमोरील मोकळ्या जागेवर सुरू झालेल्या या उत्सवासाठी सुरुवातीला त्या जागेचा वापर करण्यात आला. मात्र भूमाफियांनी अतिक्रमण केल्यानंतर उत्सव रस्त्यावर हलवण्यात आला. याच दरम्यान मनोज प्रधान यांना निवडणूक लढवायची होती आणि ते मंडळात सक्रिय झाले. त्यांच्यासोबतच डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही मंडळात प्रवेश केला.
या मंडळाच्या यशोगाथेत डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कार्यकर्ता म्हणून मंडळात प्रवेश केलेल्या आव्हाड यांनी गणेशोत्सवाच्या आरासेपासून मूर्ती तयार करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वतः सक्रिय सहभाग घेतला. १९९० मध्ये कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास २००३ मध्ये विधान परिषद आमदार बनल्यानंतरही मंडळाशी तितकाच जोडलेला राहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने नितीन देसाई यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांची साथ घेऊन भव्य देखावे साकारले. त्यांनी अनेकदा रात्रभर कार्यकर्त्यांसोबत राहून देखावे उभारले आहेत, त्यावेळी त्यांच्याकडे येझदी मोटरसायकल होती, ती घेऊन ते यायचे, अशा आठवणी सांगताना मंडळाचे सरचिटणीस रमेश चौधरी हे जुन्या आठवणीत रमले.
गणेशमूर्तीचे पेटंट
पूर्वी मंडळाच्या मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्याकडून घेतल्या जात. मात्र, वेळेत मूर्ती मिळण्यात अडचणी आल्याने डॉ. आव्हाड यांच्या पुढाकाराने नितीन देसाई यांच्याकडून मूर्ती डिझाइन करून घेतली गेली आणि ती कळव्यातील मूर्तिकार केदार घाटे यांनी साकारली. गेल्या १५ वर्षांपासून हीच मूर्ती वापरली जात असून, तिचे पेटंट घेतले गेले आहे. यामुळे दरवर्षी फक्त एकच मूर्ती तयार होते. यापूर्वीच्या मूर्तीत रिद्धी-सिद्धी उभ्या होत्या, तर आता त्या बसलेल्या स्वरूपात आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.
देशभरातील मंदिरांचे दर्शन… ठाण्यातच!
मराठी माणूस उत्कृष्ठ पर्यटक असला तरी आर्थिक आणि कौटुंबिक अडचणीमुळे देशभरातील तीर्थस्थळांना भेट देणे अनेकांसाठी अशक्य होते. हीच गरज ओळखून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारतभरातील मंदिरांची प्रतिकृती निर्माण करत भाविकांना पाचपाखाडीमध्येच तीर्थदर्शन घडवले. या गणेशोत्सवातील देखावेही नेहमीच विशेष आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. देखाव्यांचे विषय काय असावेत, हे आव्हाड सुचवायचे आणि त्याच्या प्रत्यक्ष मांडणीत त्यांचा कार्यकर्त्याप्रमाणे सहभाग असायचा. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत, शहीद स्मारक, काश्मीरमधील चरार-ए-शरीफ, गणेश दरबार, सुवर्ण स्वर्ग यांसारख्या विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा मंडळाने महाराष्ट्रातील अकरा जागृत मारुती मंदिरांची प्रतिकृती उभारली आहे. यामध्ये फायबर, लाकूड व नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे.
आनंद दिघेंची आठवण
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे गणपतीच्या काळात सर्व भागातील मंडळांना भेट द्यायचे. शेवटी ते दोनच गणपती पाहायचे – नरवीर तानाजी मंडळाचा आणि चंदनवाडी शाखेचा. एकदा नरवीर तानाजी मंडळाने ‘हिंदू-मुस्लीम एकते’वर १८ मिनिटांचा देखावा सादर केला होता, तर चंदनवाडी शाखेने हिंदी चित्रपटसृष्टीवर आधारित ५० मिनिटांचा देखावा उभारला. त्यावर नाराजी व्यक्त करत दिघेंनी चंदनवाडी मंडळाच्या कार्यकर्त्यांना नरवीर तानाजी मंडळाचा देखावा पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रघुनाथ मोरे यांच्यासह त्या मंडळाचे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी पाहणीसाठी आले, अशी आठवण रमेश चौधरी यांनी सांगितली.