जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा विळखा आणखी वाढत असून रुग्णांची संख्या २१० झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयात स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. सर्वाधिक चार रुग्ण हे ठाणे शहरातील असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहे. तर, जिल्ह्यातील मृतांच्या संख्येतही वाढ होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या चार होती. परंतू, शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालेले रुग्ण हे सहव्याधी असलेले होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात सोमवारी रुग्णांची संख्या १२५ इतकी होती. परंतू, या संख्येत मागील चार दिवसात ८५ ने वाढ झाली असून सद्यस्थितीला जिल्ह्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २१० इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १४१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. त्यापाठोपाठ, कल्याण-डोंबिवली ३५, नवी मुंबई २०, ठाणे ग्रामीण सहा, मिरा भाईंदर पाच, बदलापूर दोन आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा सामावेश आहे. जिल्ह्यात सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित ९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये चार रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. तर, एक रुग्ण अंबरनाथ शहरातील आहे.
ठाणे शहरात शुक्रवारी नवे ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. तर, ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा चार इतका झाला आहे. शहरात शुक्रवारी नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ६१ होते. सहव्याधी असलेला हा रुग्ण होता. ताप आणि श्वसनास त्रास होत असल्यामुळे २५ जुलै ला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची स्वाईन फ्लूची चाचणी करण्यात आली तेव्हा तो स्वाईन फ्लू बाधित असल्याचे निष्पन झाले. परंतू, २६ जुलै ला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडे या रुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे.