रिक्षामध्ये प्रवाशांसाठी पाणी, टी.व्ही., पंखा, वर्तमानपत्र आणि मोबाइल चार्जिगची सुविधा
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत रिक्षाचा प्रवास म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी शिक्षाच असते. मात्र, सार्वजनिक वाहतुकीची ही तीनचाकी कसरत काहीशी सुसह्य़ करण्याचा प्रयत्न ठाण्यातील प्रदीप बागवे या चालकाने केला आहे. बागवे यांच्या रिक्षात बसताच समोर दिसणारा टीव्ही, पंखा, वर्तमानपत्र आणि मोबाइल चार्जिगची सुविधा पाहून प्रवासीही क्षणभर चक्रावून जातात. पण या रिक्षाचे भाडे मीटरप्रमाणेच असल्याचे समजताच तेही या आरामदायक सफरीसाठी निवांत होतात. विशेष म्हणजे, बागवे यांची ही मालकीची रिक्षा नाही. मात्र, प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यासाठी त्यांनी भाडय़ावर चालवण्यासाठी घेतलेल्या रिक्षात हे बदल केले आहेत.
गेल्या एक तपाहून अधिक काळ रिक्षा व्यवसायात असलेल्या प्रदीप बागवे यांनी अगदी सुरुवातीपासून रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रवाशांची गरज ओळखून त्यात पाण्याची बाटली ठेवण्याचे सौजन्य कसोशीने पाळले आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांनी घामाघूम होऊन रिक्षात बसलेल्यांची तहान भागवली जात आहे. त्याचप्रमाणे ते त्यांच्या रिक्षात वर्तमानपत्रही ठेवत आहेत. आता गुढीपाडव्यानिमित्ताने त्यांनी आपली रिक्षा मराठमोळ्या पद्धतीने सजवली आहे. विशेष म्हणजे या सर्व सोयी पुरविल्याचे कुठलेही जादा पैसे ते प्रवाशांकडून आकारत नाहीत.
प्रदीप बागवे यांच्या रिक्षात नेहमीच प्रवाशांनी पिण्यासाठी पाणी ठेवले जाते. एकदा एसटीतून ते स्वत: प्रवास करत असतांना त्यांना खूप तहान लागली. ती एस.टी पुढील स्थानकात थांबेपर्यंत ते तहानेने व्याकूळ झाले. त्यावेळी आपल्या प्रवाशांनाही असाच त्रास होत असेल, याची जाणीव त्यांना झाली. तेव्हापासून त्यांनी रिक्षात थंडगार पाणी ठेवण्याची सोय केली. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या रिक्षात पंखा आणि टीव्हीचीही सोय केली आहे.

संपूर्ण ठाणे शहरात संचार
दहावी उत्तीर्ण असलेल्या प्रदीप बागवे यांनी नोकरीपेक्षा रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण ठाणे शहरात त्यांचा संचार असतो. ते कधी कुठलेच भाडे नाकारीत नाहीत. अर्थात त्यांच्या या लौकिकामुळे अनेक प्रवाशांनी त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी ते देशाप्रती प्रेम म्हणून प्रवाशांना मीटरच्या निम्मे दर आकारून प्रवास घडवतात.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.