निर्बधांनुसारच उत्सव साजरा करण्याचा निर्णय

ठाणे : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागू केलेले निर्बंध शिथिल करा, असा आग्रह धरणाऱ्या ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी आता नरमाईची भूमिका घेत र्निबधांनुसारच उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. कोकणातील महाड, चिपळूण येथे आलेला पूर, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका यांमुळेच मंडळांनी ही भूमिका घेतली आहे. करोनामुळे वर्गणी जमविणे कठीण जात असल्यामुळे मंडळांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. यातूनच मंडळांनी केलेल्या मागणीच्या आधारे आयुक्तांसोबत चर्चा करून गणेश मंडपाचे भाडे माफ करण्यात येईल, असे आश्वासन महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी मंडळांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत दिले आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. त्या वेळेस करोना प्रतिबंधक लसही आली नव्हती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठय़ा संख्येने एकत्र येत असल्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध घालत त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळांना केले होते. त्यास मंडळांनीही प्रतिसाद दिली होता. यंदाही राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी निर्बंध लागू केले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा करोना रुग्णांची संख्या कमी असून त्याचबरोबर लसीकरणही सुरू आहे, तरीही गणेशोत्सवासाठी निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

गणेशोत्सवासाठी लागू केलेले निर्बंध मागे घेण्याचा आग्रह ठाण्यातील मंडळांनी धरला होता. त्यासाठी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. महापालिका र्निबधांची अंमलबजावणी करण्यावर ठाम होती. यामुळे मंडळे आणि महापालिका असा संघर्ष होण्याची चिन्हे होती. परंतु सोमवारी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत निर्बधांनुसारच उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

बैठकीत काय झाले?

गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू करण्याची मागणी मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. याबाबत प्रयत्न सुरू असले तरी पोलिसांकडून पूर्ण सहकार्य मिळत नसल्याचे महापौर म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंडळांनी आता ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपाजवळ जाहिरात बॅनर लावण्यास परवानगी देता येणार नाही, तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करता येणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. करोनामुळे वर्गणी जमविणे शक्य नसल्यामुळे मंडळांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. यामुळे गणेशोत्सव मंडपाचे भाडे माफ करण्याची मागणी मंडळांच्या प्रतिनिधींनी केली आहे. त्यावर याबाबत आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन म्हस्के यांनी दिले.

महाड, चिपळूणमध्ये आलेला पूर, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका यांमुळे मंडळांनी  निर्बधांनुसारच उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. तर २५ ते ३० टक्के मंडळे आजही निर्बंध शिथिल होतील या आशेवर आहेत. मंडळांपुढे आर्थिक पेच निर्माण झाल्याने मंडप भाडे माफ करण्याची मागणी केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ते आयुक्तांसोबत चर्चा करणार आहे.

– समीर सावंत, अध्यक्ष, जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती