उल्हासनगर: शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आता पोलिसांचा तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. शहरात १ हजार ५९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शनिवारी उल्हासनगर पोलिस नियंत्रण कक्षासोबतच नूतनीकृत महिला तक्रार निवारण कक्ष, नवीन सीसीटीव्ही कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल यांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी घनिष्ठ कार्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
गेल्या काही वर्षात अपघात, गुन्हे स्थळावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सर्व प्रकार लोकांपर्यंत पोहोचला आहे. अपघात होत असल्यास चूक कुणाची हा अनेकदा वादाचा विषय असतो. तर गुन्हा घडल्याच्या ठिकाणी नेमका गुन्हा कसा घडला याची माहिती या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असते. तपासात, पुरावा म्हणून हेच चित्रण फायदेशीर ठरते. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे वाढवण्यासाठी पोलिस प्रशासन आग्रही होते.
याच दृष्टीने उल्हासनगरच्या परिमंडळ चारमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता उल्हासनगर पोलिस परिमंडळ–४ मधील विविध ठिकाणी एकूण १ हजार ५९३ सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करण्यात आले आहेत. शहरातल्या विविध भागात, विविध रस्त्यांवर चौकात, वर्दळीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यापैकी ११३ कॅमेरे थेट लाइव्ह मॉनिटरिंगसाठी जोडले गेले आहेत, ज्यामुळे शहरातील गुन्हेगारी आणि अन्य शंका उत्पन्न होणाऱ्या हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवता येईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
गुन्हे उकलण्याची गती आणि नागरिकांचे सहकार्य
पोलीस आयुक्त डुंबरे यांनी या नवीन सुविधांमुळे गुन्हे उकळण्याची गती वाढेल अशी आशा व्यक्त केली आहे. महिला अत्याचार प्रकरणांमध्ये ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या १३ अधिकारी व अंमलदारांना विशेष गौरव दिला. यात तसेच उत्कृष्ट तपास पथकातील ४ अधिकारी व ७ अंमलदारांनाही प्रशस्तिपत्रक देण्यात आले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यक्षमतेचे देखील डुंबरे यांनी कौतुक केले, तर नागरिकांच्या सहकार्याविषयीही समाधान व्यक्त केले. उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी हा पाऊल निश्चितच प्रगतीशील ठरणार आहे.