डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील पु. भा. भावे सभागृहातील तलाठी कार्यालयातील दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलुप तोडून रात्रीच्या वेळेत या कार्यालयातील महसूल विभागाची काही कागदपत्रे चोरून नेण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी केला असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. दरवाजा फोडल्यानंतर भूमाफियाने बाहेर पडल्यानंतर जाताना दरवाजाला नवीन कुलूप लावले. मग तेथून पळ काढला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
या चोरीप्रकरणी ठाकुर्ली तलाठी साझेचे मंडल अधिकारी रवींद्र काळुराम जमदरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीतील पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील भावे सभागृहात तलाठी आणि मंडल कार्यालय आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम भौगोलिक भूभागाची जमीन महसुली कागदपत्रे या कार्यालयात आहेत. डोंबिवलीत जमिनीचे भाव वाढलेत. आपल्या मालकीचा, कब्जे वहिवाटीचा एक इंच जमिनीचा तुकडा सोडण्यास जमीन मालक तयार नाही. जमिनीच्या लहानशा तुकड्यावर आता मनमानीप्रमाणे बांधकाम करता येते. याची जाणीव झाल्यापासून जमिनीची कागदपत्रे तलाठीकार्यालयातून मिळविण्यासाठी भूमाफियांची धडपड असते.
काही वेळा जमीन मालक एक आणि त्या जमिनीवरील कब्जे वहिवाटदार वेगळाच. यामुळे काही जमिनींवरून वाद डोंबिवली शहरात सुरू आहेत. अशा जमिनींची मूळ कागदपत्रे आणि त्या कागदपत्रांवरून नक्कल बनावट कागदपत्रे तयार करण्याची भूमाफियांची क्लृप्ती असते. एकदा महसुली कागद मग तो बनावट असला तरी त्या माध्यमातून भूमाफिया भरपूर उलाढाली करतात. डोंबिवलीत ६५ बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती या सात बारा, फेरफार बनावट पध्दतीने तयार करून, अन्य कोणाचे महसुली कागदपत्रे वापरून भूमाफियांनी उभारल्या आहेत.
अशी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मूळ कागदपत्रे तपासणे गरजेचे असते. काही वेळा अशी कागदपत्रे काढताना महसूल विभागाकडून मूळ मालकाचा प्रश्न उपस्थित करत भूमाफियांना कागदपत्रे देण्यास नकार दिला जातो. काही भूमाफिया ती कागदपत्रे मिळविण्यासाठी कागदपत्रे चोरी, अन्य कोठून मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. अशा पध्दतीने ही चोरी झाली असण्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या आठवड्यात भावे सभागृहातील तलाठी, मंडल कार्यालयात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुरू होते. पावणे सहा वाजता कार्यालय बंद करून तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयाचा नेहमीप्रमाणे दरवाजा बंद करून निघून गेले. त्यानंतर शनिवार, रविवार अशी दोन दिवस कार्यालयाला सुट्टी होती. या संधीचा गैरफायदा घेत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तलाठी कार्यालयाच्या दरवाजाचे कडीकोयंडा, कुलूप धारदार लोखंडी पट्टीने तोडले. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. त्याने महसुली कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न केला. जाताना चोरट्याने कार्यालयाला नवीन कुलुप लावले आणि तेथून पळ काढला.
प्राथमिक पाहणीत कार्यालयातून काही महसुली कागदपत्रे चोरीला गेली आहेत असे दिसत नाही. प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी करताना कागदपत्रे आढळली नाहीत तर त्यावेळी कोणती कागदपत्रे चोरट्याने चोरून नेली ते निदर्शनास येईल, असे मंडल अधिकारी रवींद्र जमदरे यांनी सांगितले.