लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: राबोडी येथील के-व्हीला भागातील नाल्यावरील पुल प्रकल्पाच्या कामात बाधित होणारी जलवाहीनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा शनिवारी १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
के-व्हीला भागातील नाल्यावरील पुल प्रकल्पाच्या कामात ५०० मीमी व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. ही वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे शनिवार, ६ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ यावेळेत जेल जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जेल जलकुंभावरून श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी १, राबोडी २, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस वसाहत, टेंभीनाका, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसरात पाणी पुरवठा होतो. या भागांचा पाणी पुरवठा १२ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.