एकपडदा चित्रपटगृहेही बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकांक्षा मोहिते, लोकसत्ता

ठाणे : राज्य शासनाने राज्यभरातील नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ठाण्यातील नाटय़गृहांमध्ये पहिल्याच दिवशी एकही प्रयोग झाला नाही. ठाण्यातील सर्वात जुने असलेले राम गणेश गडकरी रंगायतन दुरुस्तीच्या कामकाजामुळे महिनाभर बंद ठेवण्यात आले आहे, तर डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पहिल्या दिवशी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांची नोंदणी नव्हती. 

करोनाच्या प्रार्दुभावामुळे मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्य शासनाने करोना निर्बंधामध्ये हळूहळू शिथिलता आणली. त्यामुळे राज्यातील नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे २२ तारखेपासून ५० टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे मोठय़ा उत्साहाने सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. ठाणे हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे महापालिका क्षेत्रात दोन नाटय़गृहे आहेत. ठाणे शहरात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह अशी दोन नाटय़गृहे आहेत. मात्र गडकरी रंगायतन नाटय़गृहाचे दुरुस्तीचे कामकाज सुरू असल्यामुळे जवळपास एक महिना हे नाटय़गृह बंद राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची शुक्रवारी नोंदणी नसल्यामुळे पहिल्याच दिवशी ठाण्यातील नाटय़गृहांमध्ये तिसरी घंटा वाजली नसल्याचे चित्र होते.

दुसरीकडे मालमत्ता कर आणि वीज भरणामध्ये सवलत यासंदर्भात शासनाने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे चित्रपटगृहे सुरू करण्यास अनेक आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीला ठाण्यातील ‘वंदना’, ‘गणेश’, ‘मल्हार’ आणि ‘आनंद’ ही एकपडदा चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चित्रपटगृह व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहावर भार

गडकरी रंगायतन दुरुस्तीच्या कामकाजामुळे बंद असल्यामुळे काही दिवस डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोग सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यामुळे या नाटय़गृहावर थोडय़ा प्रमाणात कार्यक्रमांचा भार येणार असल्याचे घाणेकर नाटय़गृहाचे व्यवस्थापक भालचंद्र घुबे यांनी सांगितले.

चित्रपटगृहे सुरू करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु अनेक आर्थिक अडचणी असल्यामुळे सद्य:स्थितीला एकपडदा चित्रपटगृहे काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

विजू माने, चित्रपट दिग्दर्शक

गडकरी रंगायतन हे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या नाटय़गृहात जाणे सोयीचे होते. मात्र अद्यापही हे नाटय़गृह बंद असल्यामुळे शहरातील दुसरे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये जाणे दूर पडते. त्यामुळे जास्तीचा वाहन खर्च होतो. त्यामुळे लवकरात लवकर हे नाटय़गृहाचे काम पूर्ण होण्याची मागणी आहे. 

राजन मयेकर, प्रेक्षक, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was no show in theaters in thane on friday zws
First published on: 23-10-2021 at 01:36 IST