कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर अनेक प्रवासी रेल्वे मार्गातून पत्रीपूल, सांगळेवाडी, लोकग्राम भागात पायी जातात. अशा प्रवाशांना रेल्वे  मार्गात एकटे गाठून  त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या  जवळील पैसे,  मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या भामट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी अटक केली. मोनू चाळके असे चोरट्याचे नाव आहे. तो अंबरनाथमधील रहिवासी आहे.  तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यान पत्रीपूल दिशेने रेल्वे मार्गात रात्रीच्या वेळेत प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले  होते. याविषयी तक्रारी दाखल होत होत्या. बुधवारी पहाटे एक प्रवासी मुंबईतील रात्रपाळीची नोकरी करून कल्याणमधील आपल्या घरी परतत होता. तो रेल्वे मार्गातून पत्रीपूल दिशेने पायी चालला होता. अंधार असल्याने त्याला दबा धरून बसलेला चोरटा दिसला नाही. प्रवाशी जवळ येताच दबा धरून बसलेल्या चोरट्याने प्रवाशाला पकडून त्याला चाकूचा धाक दाखविला. प्रवाशाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरटा अधिक आक्रमक होऊन प्रवाशाला मारहाण करू लागला. जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने प्रवाशाने मवाळ भूमिका घेताच, चोरट्याने चाकूचा धाक दाखवून प्रवाशाकडील महागडा मोबाईल हिसकावून घेतला आणि पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशाने चोरट्याच्या केलेल्या वर्णनावरून शोध मोहीम राबविली. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातून त्याला अटक केली. चाळकेकडून रोख रक्कम, चोरीचा मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. त्याने रेल्वे  मार्गात असे किती प्रकार केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.