कल्याण- येथील घोडेखोत आळीमधील दक्षिणमुखी मारुती मंदिरात मंगळवारी पहाटेच्या वेळेत चोरट्याने चोरी करुन मंदिरातील ९२ हजाराचा ऐवज चोरुन नेला होता. मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली होती. या चोरी प्रकरणातील आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत भिवंडीतून अटक केली.
हेही वाचा >>> बदलापूर: बारवी नदीकिनारच्या ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा; धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास स्वयंचलित दरवाजे उघडणार
साकीब उर्फ सलमान मोहम्मद अख्तर अन्सारी (२४,रा. जब्बार कम्पाऊंड, अबरार अन्सारी यांची खोली, भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा ९२ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.घोडेखोत आळीमधील मंदिरा रात्री १० वाजता बंद केले जाते. नेहमीप्रमाणे पुजाऱ्याने रात्री मंदिर टाळे लावून बंद केले. मंगळवारी पहाटेच्या वेळेत पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने मंदिराच्या भिंतीलगतच्या लोखंडी जाळ्या कापून मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या गर्भगृहाला असलेल्या दरवाजाचे टाळे तोडून टाकले. गाभाऱ्यात प्रवेश करुन मारुतीला परिधान केलेले चांदीचे दागिने, चांदीचा सव्वा किलो वजनाची गदा, चांदीचा मुकुट, चांदीचे रुईच्या पानांचा हार, पितळी टोला, टाळ, दानपेटीतील रक्कम, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, एलईडी टीव्ही असा ९२ हजाराचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला होता.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील न्यू आयरे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
पहाटेच्या वेळेत पुजारी मंदिर उघडण्यासाठी आला तेव्हा त्याला मंदिरात चोरी झाल्याचे समजले. मंदिरातील किमती ऐवज चोरीला गेल्याने या भागातील रहिवासी दीपेश देशमुख यांच्या तक्रारीवरुन बाजारपेठ पोलिसांनी चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. भिवंडी पोलिसांनी या चोरीचा समांतर तपास सुरू केला होता. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, हनुमंत वाघमारे, रवींद्र पाटील यांचे पथक मंदिर परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासून आरोपीचा शोध घेत होते. चोरटा भिवंडी परिसरातील असल्यावर पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्याची माहिती काढल्यावर तो जब्बार कम्पाऊंड भागात राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या भागात सापळा लावून साकिबला अटक केली. त्याने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत. याची माहिती पोलीस घेत आहेत.