ठाणे : रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. सोन्याचे दोन हार, सोन साखळी, दोन अंगठ्या,असे १५ तोळे सोने, ५० हजारांची रोकड आणि देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मुर्त्या असा एकूण नऊ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.
ठाण्यातील चरई येथील धोबी आळी परिसरात राहणाऱ्या कापडी कुटुंबियांच्या घरी ही घटना घडली. सुदेश कापडी हे त्यांच्या पत्नीला घेऊन मेव्हण्याकडे (तिच्या भावाकडे) रक्षाबंधनसाठी गेले होते. घरातून निघताना त्यांनी घराच्या मुख्य आणि संरक्षक दरवाजाला कुलूप लावले होते. रविवारी ते घरी परतले असता, त्यांना कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरमधील साहित्य, कपाट उघडे होते. त्यांनी कपाट पाहिले असता, त्यामधील सोन्याचे दोन हार, सोन साखळी, दोन अंगठ्या असे १५ तोळे सोने, ५० हजार रुपये रोख रक्कम आणि देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मुर्त्या असा एकूण नऊ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
त्यानंतर नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. कष्टाने कमावलेले सोने व पैसे अशा प्रकारे चोराने लंपास केल्यामुळे कापडी कुटुंबीयांवर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.