Marathi School ठाणे : गेले काही वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्येत घसरण होत असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. पटसंख्या वाढीसाठी शाळांकडून विविध उपक्रम राबविले जात असून अशाचप्रकारे एका शाळेने पटसंख्या वाढीसाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या भिंतीच बोलक्या करण्यात आल्या आहेत. शिक्षणप्रेम जागवणारे संदेश, सर्जनशील चित्रे आणि पर्यावरणाविषयी जागृकता या संदर्भातील चित्रे शाळेच्या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत. या चित्रांमुळे शाळेचे रुपडे पालटले असून विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत.

अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा कल लक्षात घेता अनेक पालक आपल्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या घटल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. मराठी शाळा बंद होऊ नये यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे. तसेच काही मराठी शाळा पटसंख्या वाढीसाठी शाळास्तरावर विशेष प्रयत्न देखील करत आहेत. यामध्ये शाळास्तरावर अनोखे उपक्रम राबविले जात असून शाळा व्यवस्थापकांकडून घेतलेल्या उपक्रमाचे फोटो तसेच माहिती शाळांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. अशाचप्रकारे वागळे इस्टेट भागातील लोकमान्यनगर परिसरात राज ठाकूर विद्यामंदिर शाळा आहे. लोकवस्तीत वसलेली ही शाळा खूप जुनी आहे.

याशाळेत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेले काही वर्षांपासून या शाळेतील पटसंख्या रोडावली आहे. ही पटसंख्या पुन्हा वाढावी यासाठी शाळा व्यवस्थापकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या शाळेत होत असलेले विविध उपक्रम पालकांना समजावे तसेच इतरांना दिसून यावे यासाठी आता, शाळेतल्या भिंतींवर विविध चित्र रेखाटण्यात आली आहेत. यशोधा फाऊंडेशन आणि सेंट्रम फाऊंडेशन यांच्या सहाय्याने हे चित्रे रेखाटली आहेत. यामध्ये शैक्षणिक चित्रांसह, पर्यावरणाविषयी संदेश, प्रतिज्ञा, सर्जनशील चित्रे अशा विविध चित्रांचा समावेश आहे. या चित्रांमुळे शाळेतील सर्व भिंती या बोलक्या झाल्या असून विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेताना आनंद मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाची विशेष भिंत

प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेत साजरा व्हावा यासाठी विद्यार्थ्यांला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास एक भिंत सजविण्यात आली आहे. या भिंतीवर ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव त्यादिवशी लिहिले जाणार आहे. अशा स्वरुपात त्या विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून माहिती

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हेल्पलाईन नंबर भितींवर लिहीले गेले आहेत. तसेच पालकांनी आपल्या पाल्याची कशा काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील माहिती यामार्फत देण्यात आली आहे.

या स्वरुपाच्या चित्रांचा समावेश

विद्यार्थ्यांना मूल्ये शिकविणारा मूल्यांचा मोर रेखाटण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची आणि ठाणे जिल्ह्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राचा नकाशा देखील भिंतींवर काढण्यात आला आहे, अशी माहिती शाळेतील शिक्षिका शोभा मोरे यांनी दिली.