विभक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या आजच्या या जगात सर्व कुटुंब एकत्र येऊन सणोत्सव साजरा करताना दिसणे तसे अवघडच. सणोत्सव हे कुटुंबाला जोडणारा एक धागा आहे. या पंक्तीला साजेशा पद्धतीने ठाण्यातील जोशी कुटुंब मागील सात दशकांपासून गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करत आहे. देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्याच वर्षी लक्षमण राव तट्टू-जोशी यांनी ठाण्यातील खारकर आळीमधील ‘ स्वामी नारायण भुवन’ या राहत्या घरी गणेशोत्सवाची रुजवात केली. लक्ष्मण राव जोशी यांच्या तिसऱ्या पिढीने अविरतपणे ही परंपरा कायम ठेवली आहे. जोशी कुटुंबाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ७५ वे वर्ष आहे. त्यामुळे यंदा ‘ गणेशोत्सवाचे अमृतमहोत्सवीवर्षी ‘ जोशी कुटुंबातील ७८ सदस्यांकडून अगदी जल्लोषात साजरे केले जात आहे.

हेही वाचा >>> कल्याण : मंगला एक्सप्रेसमध्ये विसरलेला मोबाईल कसारा रेल्वे पोलिसांकडून प्रवाशाला परत

लक्ष्मणराव जोशी याचे कुटुंब हे मूळचे पुण्यातील जुन्नर गावाजवळील पाटस या गावचे. पेशवे काळात महड येथील गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. यावेळी या मंदिराचे पुजारीपण या कुटुंबाला प्राप्त झाले. त्यामुळे हे कुटुंब महाड येथे स्थायिक झाले. काही वर्ष या मंदिराचे पुजारित्व या कुटुंबाने सांभाळले. यानंतर काही कारणास्तव लक्ष्मणराव जोशी हे पुण्यात शिक्षणासाठी आले. तेथे त्यांनी पौरोहित्याचे विधिवत शिक्षण घेतले. त्यानंतर कुटुंब चरितार्थासाठी आणि अर्थार्जनासाठी जोशी हे आपल्या आठ मुलांसह १९३९ साली ठाण्यात राहण्यास आले. ठाण्यातील खारकर आळीतील जोशी वकिलांच्या वाड्यात हे कुटुंब स्थिरस्थावर झाले. स्वामीनारायण भुवन असे वाड्यास नाव देण्यात आले. लक्ष्मणराव जोशी यांनी ठाण्यात पौराहित्याचे काम केले. यानंतर १९४७ साली स्वामी नारायण भुवन या वाड्यात गणेशोत्सवाची रुजवात केली. यानंतर १९७५ साली लक्ष्मणराव यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या मुलांनी परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव साजरा केला. १९४७ ते २००६ सालापर्यंत जोशी कुटुंबाने एकत्र राहात स्वामी नारायण भुवन या वास्तूमध्ये गणेशोत्सव साजरा केला. यानंतर कुटुंबांतील सदस्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे वाडा सोडून सगळी भावंडं ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील विविध इमारतींमध्ये वास्तव्यास गेली. यातील आठ भावंडांपैकी एकाचे निधन झले असून उर्वरित सात भावंडं प्रत्येक वर्षी एकाच्या घरी गणपती या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा गणेशोत्सव हे लक्ष्मणराव जोशी यांचा मुलगा अरविंद जोशी यांच्या घरी साजरा केला जात आहे. अरविंद जोशी यांचा मुलगा अजय जोशी हे यंदाच्या गणेशोत्सवाची सर्व जबाबदारी पार पाडत आहे. सध्या जोशी कुटुंबांच्या सदस्यांची संख्या ७८ आहे. यातील प्रत्येक जण दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून एकत्र जमतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात जोशी यांचे घर अगदी लग्नघर असल्यासारखे गजबजून जाते. लक्ष्मणराव यांची चौथी पिढी यात हिरहिरीने भाग घेते. यंदाचे हे वर्ष गणेशोत्सवाचे ७५ वे वर्ष असल्याने जोशी कुटुंबीय अगदी उत्साहात साजरे करत आहे. सगळ्यांची वास्तव्याची ठिकाणे मागील काही वर्षांपासून जरी वेगळी असली तरी सणोत्सवाच्या निमित्ताने जोशी कुटुंब एकत्र येत आपली वडिलोपार्जित चालत आलेली गणेशोत्सवाची परंपरा जपत आहेत.

हेही वाचा >>> ब्रिटनमधून आकर्षक भेटवस्तू पाठवितो सांगून पलावा येथील महिलेची ७३ लाखांची फसवणूक

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
गणशोत्सवानिमित्त ज्यांच्या घरी गणरायाचे आगमन होते , त्याघरी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात तरुण मंडळींसह घरातील ज्येष्ठ मंडळी देखील सहभागी होतात. कविता वाचन, वाद्यवाजन, विविध खेळ, गप्पा – गोष्टी यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच यंदा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून तरुणांना कुटुंबांची माहिती तसेच सणोत्सव आणि परंपरा याविषयीची माहिती देणाऱ्या जुन्या आठवणींना उजाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अजय जोशी यांनी सांगितले.

आर्थिक खर्चाची ही योग्य सांगड
कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी असल्याने कोण्या एकावरच खर्चाचा भार पडू नये यासाठी सर्व भावंडांकडून बँकेत दरवर्षी एक ठराविक रक्कम सणोत्सवासाठी लागणाऱ्या खर्चासाठी जमा करण्यात येते. या रक्कमेतून दिवाळी, गणेशोत्सव, घरातील सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात.
जोशी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा हात घट्ट धरून आपली वाटचाल सुखनैव करत आहे. आमचे कुटूंब गेल्या ७५ वर्षांपासून गणेशोत्सव त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरे करत आहे. काही वर्षांपासून केवळ गणरायाच्या स्थापनाचे ठिकाण बदलते आहे. मात्र सर्व जोशी कुटुंब गणेशोत्सवानिमित्त आणि इतर सणांच्या निमित्ताने एकत्र येते. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या जगात देखील जोशी कुटुंब एकतेने राहत असल्याचे समाधान वाटते.– अजय जोशी, ठाणे</strong>