कल्याण – दुकानदारांकडून सामान खरेदी करायचे. दुकानदाराला फोन पे या उपयोजनच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून पैसे भरल्याचे खोटेपणा करून दाखवायचे आणि तेथून पळ काढायचा. दुकानदाराने फोन पेच्या माध्यमातून ग्राहकाचे पैसे जमा झाले की तपासताना त्यांना ग्राहकाकडून पैसे जमा झाल्याचे नसल्याचे समजायचे. अशाप्रकारे कल्याण, डोंबिवली परिसरातील दुकानदारांची फोन पे उपयोजनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पंकज गोपाळ पाटील (रा. साई सनम सोसायटी, साईनाथ नगर, ठाणे), अनिल अरूण कांबळे (रा. गणेशवाडी, पाचपाखाडी, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या भुरट्यांची नावे आहेत. या दोन्ही भुरट्यांकडून इतर काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांना आहे.कल्याण पूर्व भागात संतोषनगर भागात राहणारे विशाल बोडके यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, की तिसगाव नाका येथील आर. के. बाजार दुकानात गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन तरूण आले. त्यांनी सहा हजार २९३ रूपयांचे किराणा सामान खरेदी केले. त्यांनी फोन पेमधील बनावट खात्यामधून दुकानदाराला आपण किराण सामान खरेदी केल्याची सहा हजार २९३ रूपयांची रक्कम भरणा केली आहे, असे दाखविले. दुकानदाराने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दोन्ही तरूण दुकानातून निघून गेल्यावर दुकानदाराने दुकानातील फोन पे खाते तपासले. त्यावेळी त्यांना पैसे जमा झाले नसल्याचे समजले. त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, उपनिरीक्षक सिराज शेख, साहाय्यक उपनिरीक्षक दर्शन शेख यांनी आर. के. बाजार दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन तरूण दिसत होते. त्या तरूणांची पोलिसांनी ओळख पटवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हे दोन्ही तरूण ठाण्यातील असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना ठाण्यातून अटक केली. या दोन्ही भुरट्यांनी डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे एका दुकानदाराची फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. काही महिन्यापूर्वी डोंबिवली पश्चिमेत नेमाडे गल्लीतील एका दुकानात कोकणातील वस्तुंची विक्री करणाऱ्या एका दुकानदार महिलेकडून भुरट्यांनी सामान खरेदी करून त्यांची एक हजार रूपये ५०० रूपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी याप्रकरणाशी या दोन्ही तरूणांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याची मागणी होत आहे.