मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांताक्रुझ येथे केलेल्या कारवाईत बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख ९ हजार २४० रुपये किमतीची बनावट स्कॉचसह (उच्च प्रतिचे विदेशी मद्य) बनावटीचे साहित्य जप्त केले आहे.

नर्शी परबत बाभणिया (वय ३४), झाकीर मोहमद (वय ३२) व अरविंद बालमुकूंद शुक्ला (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील राज कमल सोसायटीत विदशी बनावट स्कॉचची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून आरोपींना घरातून ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडून बनावट विदेशी मद्यासह एक रिक्षा, झाकणे, कार्टन्स बॉक्स, डायमशिन व विविध प्रकारचे विदेशी मद्याचे लेबल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींवर  महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ,ब,ड, ई), ८३, ९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुंबई संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवशंकर पाटील, दुय्यम निरीक्षक समित भोसले, कैलास तरे, जवान संपत वनवे, नंद महाजन, रश्मिन समेळ यांनी केली.