डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील एका विकासकाला ५० कोटीचा पाऊस पाडतो. तुमची आर्थिक भराभराट होईल, असे आमीष दाखवून पाच भोंदूबाबांनी विकासकाच्या घरातील ५६ लाख रुपयांची रक्कम लुटून पलायन केले होते. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून तीन भोंदूबाबांना अटक केली आहे.

अशोक गायकवाड, रमेश मोकळे (रा. कसारा), महेश गुरुजी अशी अटक भोंदूंची नावे आहेत. शर्मा गुरुजी, गणेश गुरुजी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

झटपट श्रीमंत होण्याचा हा मार्ग असल्याचे समजून ठेवला विश्वास –

ठाकुर्ली चोळेगाव येथील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पांडुरंग पाटील (५१) यांना महेश गुरुजी भामट्याने संपर्क करून आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी माणसे आहेत. यामधून चांगली आर्थिक भरभराट होते. हा पाऊस पाडण्यापूर्वी ५६ लाख रुपये खर्च करावे लागतात. एवढी रक्कम खर्च केली की ५० कोटीचा पाऊस पडतो, अशी थाप मारून सुरेंद्र पाटील यांना जाळ्यात ओढले. झटपट श्रीमंत होण्याचा हा मार्ग असल्याने सुरेंद्र यांनी महेशच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन अशाप्रकारचा पाऊस पाडून घेण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सुरेंद्र पाटील यांनी जवळील सोने कल्याण येथील पारस जवाहिऱ्याकडे गहाण ठेवले. त्यांच्याकडून ५६ लाख रुपये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी ताब्यात घेतले.

सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पूजाविधी –

महेश, आकाश, शर्मा, रमेश या भोंदूबाबांच्या टोळक्याने सुरेंद्र यांना पूजाविधी करून पाऊस पाडू असे सांगून त्यांना त्यांच्या दावडी येथील पाटीदार भवन जवळील कार्यालयात सकाळच्या वेळेत येण्यास सांगितले. सुरेंद्र ५६ लाखाची रक्कम घेऊन कार्यालयात सकाळीच पोहचले. सकाळी सहा वाजताचे पूजाविधी आठ वाजता संपले. दरम्यानच्या काळात भोंदूबाबांनी सुरेंद्र यांच्याकडे पाऊस पाडण्यासाठी ५६ लाख रुपये आणले आहेत ना. ते कोठे ठेवले आहेत याची खात्री करून घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जडीबुटीचा आधार घेऊन मोहीत केले –

पाटीदार भवन जवळील श्री एकविरा स्वप्ननगरी इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गुरुजींनी पूजाविधी सुरू केले. सकाळी सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम आठ वाजता संपला. भोंदूंचे लक्ष पूजेपेक्षा बाजुच्या खोलीत ठेवलेल्या ५६ लाख रकमेवर होते. भोंदूबाबांनी सुरेंद्र यांना जडीबुटीचा आधार घेऊन मोहीत केले. त्यांना बाजुच्या खोलीत ध्यानस्थ होऊन जप करण्यास सांगितले. सुरेंद्र यांनी जप सुरू करताच भोंदूबाबांनी एका खोलीत ठेवलेले ५६ लाख रुपये गुपचूप काढून घेतले. सुरेंद्र यांना आम्ही इमारतीच्या तळमजल्याला एक पूजाविधी करावा लागतो. प्रदक्षिणा घालून वर येतो असे सांगितले. ५६ लाखाची पूरचुंडी घेऊन इमारतीखाली जाऊन भोंदू पळून गेले. बराच उशीर झाला तरी गुरुजी पूजेच्या ठिकाणी नाहीत. म्हणून सुरेंद्र इमारतीच्या खाली गेले. तेथे गुरुजी नव्हते. त्यांनी परिसरात बघितले कोठेही ते आढळले नाहीत. सुरेंद्र यांनी बाजुच्या खोलीत जाऊन ५६ लाखाची रक्कम सुस्थितीत आहे ना याची चाचपणी केली. त्यांना पैशाचा बटवा जागेवर नसल्याचे दिसले. ५० कोटी पावसाच्या नावाने भोंदूंनी आपणास फसविले आहे. अशी खात्री झाल्यावर सुरेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक माहितीच्या आधारे तीन जणांना अटक केली.