ठाणे : सरकारी अधिकारी असल्याचे भासवून तीन भामट्यांनी दिवा येथील एका व्यक्तीची २० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी व्यक्तीकडून आठ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सोमवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिवा शहरात फसवणूक झालेला व्यक्ती राहतो. त्याची या भागात वडिलोपार्जित जमीन आहे. या जमीनीवर त्यांनी इमारत उभारली होती. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. मी लोकायुक्त कार्यालयातून बोलत आहे. तुम्ही अनधिकृत बांधकाम केले आहे. तुमच्याविरोधात लोकायुक्त कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तुमच्याविरोधात कारवाई होईल असे त्या व्यक्तीने सांगितले. तसेच कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
त्यानंतर काही दिवसांनी आणखी एका व्यक्तीने त्यांना संपर्क साधला. तसेच, त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. काही दिवसांनी त्यांना व्हाॅट्सॲपवर एक बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले. त्यावर ‘गुडलक’ पैसे म्हणून २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्या व्यक्तीने तात्काळ त्या खात्यावर पैसे पाठविले.
काही दिवसांनी व्यक्तीने ठाणे महापालिका तसेच इतर कार्यालयात जाऊन त्या व्यक्तींची माहिती घेतली. परंतु तेथील कार्यालयात संबंधित नावाचे कोणतेही कर्मचारी कार्यरत नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.