लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडी महापालिकेचे कर विभागाचे प्रमुख सुदाम जाधव यांच्यासह तिघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. विना परवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करू देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सुदाम जाधव यांनी म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप बनविण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली.

सुदाम जाधव (५४), लिपीक किशोर केणे (५१) आणि लिपीक सायराबानो अन्सारी (५२) अशी ताब्यात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे १३ हजार ८०० चौ.फूटांचे बांधकाम आहे. हे बांधकाम विना परवाना असून बांधकामांचा मालमत्ता क्रमांक कायम करण्यासाठी, जुनी करण आकारणी रद्द करून नव्याने सुधारित कर आकारणी लागू करण्यासाठी सुदाम जाधव, किशोर केणे आणि सायराबानो अन्सारी यांनी त्यांच्याकडून प्रति चौ. फूटांचे १५ रुपये प्रमाणे २ लाख ७ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकारानंतर तक्रारदारांनी याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-“श्रीराम मांसाहारी…”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे आंदोलन

पोलिसांनी याप्रकरणाची पडताळणी केली असता, त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. सुदाम जाधव आणि सायराबानो यांनी लाचेची रक्कम किशोर केणे यांना घेण्यास सांगितल्याचेही निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या ६ व्या मजल्यावर केणे याला दीड लाख रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले. त्यानंतर सुदाम आणि सायराबानो यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप तयार करण्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला होता. ही कारवाई सुदाम जाधव यांच्या पथकाने केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदाम जाधव यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.